Breaking News

आक्षी शिलालेख जतन, परिसर सुशोभीकरण काम पूर्ण

आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी

मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि .31) होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून तसेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला होता. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस 1116-17च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे कर्नाटकहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून होता. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले. या शिलालेखाची निर्मिती शके 934 म्हणजे इ.स.1012 झाल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. यासह आणखी एक शिलालेख आक्षी येथे दुर्लक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा होता.आक्षी येथील दोन शिलालेखांचे जतन करण्याची मागणी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांमधून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखांची पाहणी करीत जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आक्षी शिलालेखाचे सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आक्षी शिलालेखाचे तेथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply