Breaking News

कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढूया!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; उलवे नोडमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त

उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई अशाच प्रकारे आपण सर्व मिळून लढूया, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 2) येथे केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या 60 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, पंचायत समिती सभापती देवकी कातकरी, उद्योजक जे. एम. म्हात्रे, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, पं. स. सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, साई देवस्थानचे विश्वस्त रवी पाटील, वाहतूक संघटनेचे निर्गुण कवळे आदी उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, रोज उठून केंद्र सरकारकडे बोटे दाखवायची. माहिती नसताना राजकीय विधाने करायची यातून या देशाची लढाई आपण लढू शकत नाही. माझी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे तुमची लढाई कोविडशी असली पाहिजे. भाजपशी नाही, पंतप्रधान मोदींशी नाही. मोदीजी तर तुम्हाला सोबत घेऊन कोविडशी लढाई लढताहेत, मात्र तुम्हाला यात राजकारण करायचेय. हे कृपया बंद करा. आज ज्या प्रकारे केंद्र सरकार मदत करतेय. त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा या संकटात उभा राहतोय. अर्थातच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने मिळून हे काम केले, जे आज आपल्याला केंद्राकडून पूर्णपणे दिसतेय, तर आपण अतिशय वेगाने या संकटातून बाहेर येऊ असा मला विश्वास वाटतो. अशा या प्रयत्नांमध्ये आमचे आमदार आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. याचा एक भाग म्हणून हे सुसज्ज कोविड सेंटर कार्यरत झाले आहे. याचा येथील रुग्ण नागरिकांना फायदा होईल. या वेळी त्यांनी येथील रेल्वेसंदर्भातील मागण्यांचा पाठपुरावा करू, असे आमदार महेश बालदी यांना आश्वस्त केले. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचा सन्मान होणे अतिशय आवश्यक आहे. मला राज्य सरकारला एकच सांगावेसे वाटते की, सन्माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे एक उत्तुंग प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे. मग त्यांचे नाव देत असताना ते लपूनछपून देण्याचे कारण नाही. त्यांचे नाव अनेक ठिकाणी देता येईल, पण याबाबत लोकांशी चर्चा केली पाहिजे. नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. बाळासाहेबांच्या नावावर विवाद होता कामा नये, तसेच अशा प्रकारे कुणाला माहीत नसताना अचानक कोविडच्या काळात निर्णय करणे त्यांच्या नावाला, व्यक्तिमत्त्वाला साजेसे नाही. मुख्यमंत्री याची दखल घेतील. सर्वांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. सध्या कोविडची लढाई आहे ती लढू या. हा विषय नंतरच्या काळात उपस्थित केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.  कोरोनाचे थैमान मोठे आहे. आजही संसर्ग दर 17 ते 22 टक्क्यांपर्यंत आहे. विशेषत: मुंबईचा जो वाढता भाग आहे एमएमआर रिजनचा तेथे संसर्गदर मोठ्या प्रमाणात आहे. तुलनेने ज्या सोयी आहेत त्या आणि त्याच्यावरील ताण पाहता इतक्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांना व्यवस्था करून देणे अत्यंत कठीण चालले आहे. आताच्या कोविडच्या संक्रमणात परिवारातील एक जण पहिल्यांदा संसर्गित होतो आणि तो सगळा परिवार एका दिवसात संसर्गित करतो अशी प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे विलगीकरण केल्याशिवाय हा संसर्ग थांबविता येत नाही. त्यासोबत दुसरे महत्त्वाचे आहे जे माइल्ड टू मॉडरेट रुग्ण आहेत त्यांना तत्काळ जर ऑक्सिजन मिळाला नाही तर आयसीयू, व्हेंटिलेटर देण्याची वेळ येते, ज्याची क्षमता अतिशय कमी आहे. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून ऑक्सिजन देऊन स्थिर केले तर त्यांना अ‍ॅडमिट करायची वेळ येत नाही आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता येऊ शकतो. म्हणून ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. या सेंटरमधील रुग्णांची व्यवस्था गंभीर झाली तर त्यांना जागा उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीने डेडिकेटेड बेड कसे मिळवून घेता येतील व त्यांना तेथे शिफ्ट करता येईल यासाठी मी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. देशात कोविडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला सर्वांत जास्त ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाली. वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकार राज्याला मदतदेखील करीत आहे. असे असताना विशेषकरून लसीकरणाच्या संदर्भात निरनिराळ्या प्रकाराचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने अतिशय सुयोग्य पद्धतीने पहिल्यांदा 60 वर्षांवरील, मग 45 वर्षांवरील अशा लोकांचे लसीकरण हाती घेतले. याचे कारण एका किंवा दोन महिन्यांत 135 कोटी नागरिकांसाठी लसी तयार करण्याची आपलीच काय तर जगात कुणाचीच क्षमता नाही. म्हणून मग जागतिक आरोग्य संघटनेने एक प्रोटोकॉल तयार केला जो सगळे देश फॉलो करताहेत. आपण जर कोविडचा इतिहास बघितला तर 70 टक्के रुग्ण आणि 70 ते 72 टक्केमृत्यू 45च्या वरचे आहेत. म्हणून आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या लसीकरणात 45च्या वरील लोकांना प्राधान्य दिले तर कोरोनाचा मृत्यूदर 75 टक्क्यांनी कमी आणता येईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.  भारताने इतर देशांना तेव्हा लसींची मदत केली, आता अमेरिकेसह 40 देशांनी आपल्याला विविध प्रकारे मदत केली आहे. रशियाने तर स्पुटनिक व्ही लस बनविण्याची परवानगी दिली आणि पहिल्याच झटक्यात एक कोटींपेक्षा जास्त लसी देण्याचे ठरविले. त्यातील पहिली खेप काल आपल्याकडे आलीदेखील. जर ही डिप्लोमसी भारताने केली नसती तर आज देश अलग पडला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या लसी तयार झाल्या नसत्या तर भारताची अवस्था काय असती. आपल्याला लसी आयात कराव्या लागल्या असत्या. कदाचित एक-दीड वर्ष लसीकरणच झाले नसते. असे असताना काही मंडळी अभ्यास न करता, मेहनत न घेता टीका करतात. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी तर देशातील लसींवर अविश्वास दाखविला. आमच्या राज्यात या लसी घेणार नाही, असे म्हटले होते. आता तीच राज्ये आम्हाला आधी लसी द्या, अशी मागणी करीत आहेत. लसींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदर्शीपणा दाखविला. त्यामुळे आज भारतात मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती होत आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनपर्यंत कोविशिल्डच्या प्रतिमहा 10 कोटी आणि कोवॅक्सिनच्या सहा कोटींवर लसींची निर्मिती होईल. म्हणजे 16 कोटी लसी भारतात तयार करू. भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस देऊ शकू आणि कोरोनाच्या कहरातून देश बाहेर येऊ शकेल. 18 कोटी लसी स्पुटनिक व्हीच्या होणार आहेत. इतरही चार लस पुरवठादारांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात असणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. आमदार महेश बालदी म्हणाले की, कोरोना रुग्णांसाठी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 10 बेड देण्याचे डॉ. विजय पाटील यांनी मला आश्वस्त केले. आणखी 10 डेडिकेडेट बेड आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून कोपर येथील कोविड सेंटरसाठी मिळावे. म्हणजे आम्हाला येथे एखादा रुग्ण गंभीर झाल्यास तिथे नेणे सोयीस्कर होईल यासाठी प्रयत्न करण्याची विनंती आमदार महेश बालदी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या माध्यमातून येथील रेल्वेसेवा विस्तारण्याची मागणी केली.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे -आमदार महेश बालदी

सिडको जे करायचे ते करीत नाही आणि नको ते धंदे करीत आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांनी येथील भूमिपुत्रांसाठी लढा दिल्याने साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले. म्हणूनच ’दिबां’चे नाव येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे आवश्यक असताना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जात आहे. बाळासाहेब हिमालयाएवढे आहेत. त्यांचे नाव इतर ठिकाणीही देता येऊ शकते. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही, परंतु ज्या माणसामुळे महाराष्ट्रात साडेबारा टक्के भूखंडाचे तत्त्व लागू झाले त्यांचेच नाव येथील विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली.

प्रवीण दरेकर यांच्याकडून भाजप आमदारांचे कौतुक

कोरोना संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे पवित्र व पुण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. येथील परिसर विकसित होत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सातत्याने उदार हात राहिलेला आहे. त्यांनी कोविड केअर सेंटरसाठी संस्थेची शाळा उपलब्ध करून दिली याचाही दरेकर यांनी आवर्जुन उल्लेख केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करावा, असे ते या वेळी म्हणाले.

Check Also

कसळखंड सरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह शेकाप, उबाठा कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघात येणार्‍या कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यासह …

Leave a Reply