Breaking News

भविष्य निर्वाह निधी पथकातील तिघांना लाच घेताना पकडले

अलिबाग : प्रतिनिधी

भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) रायगड कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांना तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने रंगेहाथ पकडून अटक केली. सहाय्यक लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र रामचंद्र गायकवाड, कनिष्ठ लिपिक  रुपेश सुभाष देशमुख अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत. भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करण्याकरिता आरोपींनी तक्रारदाराकडे तीन हजार  रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. 1) सापळा रचून तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे, हवालदार अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलीस नाईक सचिन आटपटकर, जितू पाटील यांचा या पथकामध्ये समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शासकीय काम करून देण्यासाठी कोणत्याही  शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड कार्यालयाशी  (02141-222331) या दूरध्वनी क्रमाकांवर किंवा 9702706333, 8169345385 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

-सुषमा सोनावणे, पोलीस उपअधीक्षक, एसीबी रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply