नऊ जण गजाआड, 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील कॉपर आणि अॅल्युमिनीयमच्या तारा चोरणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर व अल्युमिनियमची कॉईल चोरीस गेल्याचे गुन्हे रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फतदेखील सुरू होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रोहा, श्रीवर्धन, दिघी सागरी, म्हसळा, माणगाव, मुरूड, तळा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 12 गुन्ह्यांची कबुली दिली. सागर शांताराम वाघमारे (वय 28), अक्षय शांताराम वाघमारे (वय 25), दिलीप वाघमारे (वय 35), शशिकांत वाघमारे (वय 39), अनिल वाघमारे (वय 20), दत्ता वाघमारे (वय 20), संदीप पवार (वय 22, सर्व रा. देवकान्हे आदिवासीवाडी), अक्षय तुकाराम वाघमारे (वय 25) व अभिषेक विनोद शेळके (वय 22, रा. उसरोली आदिवासीवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1480 किलो कॉपर कॉईल आणि 40 किलो अॅल्युमिनीयम कॉईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चार मोटारसायकली मिळून 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक धनाजी साठे, हवालदार विकास खैरनार, अक्षय जाधव, अक्षय सावंत, सायबर सेलचे तुषार घरत यांनी ही कामगिरी पार पाडली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.