Breaking News

मुलगी शिकली, प्रगती झाली

युपीएससीच्या परीक्षेत एखाद्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. परंतु पहिले तीनही क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत असे गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. 2021 च्या युपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने पटकावला तर कोलकात्याच्या अंकिता अगरवालने दुसरा व चंदीगडच्या गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान मुंबईकर प्रियंवदा म्हाडदळकरला मिळाला आहे. ती देशात तेराव्या स्थानी आहे.

मुलींच्या शिक्षणाकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला हवे हा सुविचार गेली अनेक वर्षे देशातील धोरणकर्ते उच्चारत होते. परंतु त्याला कृतीची जोड मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर. बेटी बचाओ, बेटी पढाओ एवढी घोषणा देऊन पंतप्रधान मोदी थांबले नाहीत तर मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढायला हवा, त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये भरार्‍या घ्याव्यात या हेतूने केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत स्त्रीशिक्षणविषयक अनेक उपक्रम राबवले. त्याची मधुर फळे आता दिसू लागली आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली या बोधवाक्याचे प्रत्यंतर सोमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या निकालातून ढळढळीतपणे समोर आले. या परीक्षेच्या तिन्ही टप्प्यातून एकूण 685 जणांची नागरी सेवेकरिता निवड करण्यात आली असून यापैकी पहिल्या 25 जणांमध्ये 15 पुरुष तर 10 महिला आहेत. आजची तरुण पिढी शालेय स्तरापासूनच अनेकविध स्पर्धा परीक्षांचा सामना करीत आपली शैक्षणिक कारकीर्द घडवते. गेली अनेक वर्षे भारतीय तरुणांचा कल अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कारकीर्दीकडे मोठ्या प्रमाणात असला आणि परदेशगमनाची महत्त्वाकांक्षा बहुतेक जण आज उरी बाळगत असले तरी युपीएससीचे स्वप्नही देशभरातील लाखो तरुण-तरुणी पाहतात. आज सर्व शैक्षणिक शाखांमध्ये मुलींची कामगिरी ही मुलांच्या बरोबरीची किंबहुना अधिक नजरेत भरणारीच दिसते. युपीएससी संदर्भात बोलायचे झाले तर यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत पहिले चार क्रमांक मुलींनीच पटकावले होते. श्रुती शर्मा ही पहिला क्रमांक पटकावणारी गेल्या दहा वर्षांतील पाचवी युवती आहे. युपीएससीच्या यंदाच्या निकालात एकूण 685 उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची संख्या ही 60 पेक्षा अधिक आहे. ही कामगिरी विशेष कौतुकास्पद म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील तरुणांची संख्या अधिक आहे. शहरी तरुणांसमोर कारकीर्दीच्या अनेकविध उत्तम संधी असतात तर ग्रामीण तरुणांना आजही प्रशासकीय सेवेचे आकर्षण अधिक वाटते. या सेवांमधील कारकीर्दीतून मिळणारे आर्थिक स्थैर्य, प्रशासकीय अधिकार्‍यांची प्रतिष्ठा त्यांना खुणावत असते. या सेवांमधील पदांद्वारे हाती येणारी सत्ता, त्यातून मिळणारी समाजात बदल घडवण्याची संधी त्यांना हवीहवीशी वाटते. आपल्याकडच्या चित्रपटांतून अनेकदा प्रामाणिक सनदी अधिकार्‍यांचे चित्रण केले जाते. हे अधिकारी ग्रामीण भागातील वास्तव बदलू पाहतात असेही दर्शवले जाते. यातूनच या सेवेचे स्वप्न अनेक तरुण-तरुणींच्या मनांमध्ये उतरवले जाते. अर्थात अजुनही उत्तर भारतातीलच तरुण-तरुणी या परीक्षांना अधिक मोठ्या संख्येने बसतात. देशभरातून काही लाख तरुण-तरुणी दरवर्षी या परीक्षा देत असले तरी फारच कमी जणांना त्यात यश कसे मिळवायचे हे उमगलेले असते. अनेक जण त्यासाठी महागड्या कोचिंगचा आधार घेतात. परंतु तसे न करता स्वबळावर हे यश प्राप्त करणारेही आहेतच.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply