Breaking News

बहुतजनांशी आधारू..!

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः।

वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वानवा॥

शंभरात एक माणूस शूर निपजतो, हजारात एक पंडित, दहा हजारांत एखादा वक्ता जन्मतो, तर दानशूर क्वचितच जन्माला येतो, असा उपरोक्त संस्कृत वचनाचा अर्थ आहे. अनेकांजवळ खूप काही असूनही त्यांच्यात दातृत्वाचा अभाव असतो, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की ती समाजाशी समरस झालेली असतात, सर्वसामान्य जनतेप्रती त्यांची सदैव सहकार्याची भावना असते. अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर.

बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे जाणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ज्ञानगंगा गोरगरिबांपर्यंत पोहचवली. कर्मवीर अण्णांना अभिप्रेत असलेली पिढी घडविण्याचे काम ‘रयत’च्या शैक्षणिक पालखीचे भोई बनून लोकनेते रामशेठ ठाकूर निष्ठेने व तळमळीने करीत आहेत. पनवेल-उरण परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे या विद्यासंकुलांतून करिअरविषयक विविध अभ्यासक्रम तसेच क्रीडाविषयक घडामोडींवरही भर दिला जातो. याशिवाय स्थानिक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा याकरिता उलवे नोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आलेली आहे. आपल्या भागातील लोकांसाठी जे जे करता येईल ते ते लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आले आहेत.

प्रतिकूल परिस्थितीतून खडतर वाटचाल करीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा उंचावत गेलेला जीवनप्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे. शिक्षक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, शिक्षणमहर्षी, समाजसेवक अशा वेगवेगळ्या भूमिकांतून त्यांनी परिश्रम व सचोटीने भरारी घेतली. आवर्जून नमूद करण्यासाठी बाब म्हणजे ज्या ज्या क्षेत्रांत त्यांनी पाऊल टाकले तेथे त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे त्यांचे कार्य दीपस्तंभ ठरले आहे.

सदैव जनतेत रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत यासाठीदेखील नेहमी पुढे असतात. याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच भूमिपुत्रांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने जनआंदोलन उभारले आहे. या आंदोलनातील प्रत्येक टप्प्यामध्ये समितीचे उपाध्यक्ष असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर अग्रस्थानी राहिले आहेत. स्थानिक जनतेला सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी त्यांचा अट्टाहास असतो. नगरातून महानगरात रूपांतरित झालेले पनवेल आज विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे कोकणचे प्रवेशद्वार आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पनवेल परिसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेजारील उरण, उलवे नोडही विस्तारत आहे. अशा वेळी बाहेरून येथे वास्तव्यास येणार्‍या नागरिकांच्या मदतीसाठीही लोकनेते रामशेठ ठाकूर तत्पर असतात.

लोकनेते रामशेठ ठाकूर सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. आता पूर्ण वेळ त्यांनी जनसेवेत स्वतःला वाहून घेतले आहे. जेव्हा ते राजकारणात सक्रिय होते तेव्हाही त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले होते, कारण त्यांचा पिंड समाजसेवकाचा आहे. आजही ते सामाजिक बांधिलकी जपत अहोरात्र कार्यरत असतात. वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात त्यांनी तन-मन-धनाने गरिब, गरजूंना मदतीचा हात दिला. शिवाय वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत गतवर्षी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना देवदूत पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांना आजवरच्या कामगिरीबद्दल विविध पुरस्कार,

मान-सन्मान लाभले आहेत. ही त्यांच्या योगदानाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

अखंड ऊर्जेचा झरा असणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आजही दिवसातील 16-18 तास कार्यरत असतात. त्यांचे निवासस्थान नेहमी लोकांच्या गर्दीने भरलेले असते. असे म्हणतात, ज्या माणसाच्या घराबाहेर जितक्या जास्त चपला तितका तो माणूस श्रीमंत. या अर्थानेही लोकनेते रामशेठ ठाकूर गर्भश्रीमंत ठरतात. त्यांचे स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्पष्टवक्ते आहेत. जे काय असेल ते मोकळेपणाने बोलतात. शिवाय विषय रेंगाळत न ठेवता त्याबद्दल आपले मत व्यक्त करून तो हातावेगळा करतात.

असे हे बहुत जनांसी आधारू असलेले लोकमान्य लोकनेते रामशेठ ठाकूर 72व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना उत्तम व निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची निरंतर सेवा घडत राहो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

-समाधान पाटील, पनवेल

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply