Breaking News

दैवी आवाज हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई ः प्रतिनिधी

गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी आवाज रविवारी (दि. 6) अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात मुले खेळतात-बागडतात त्या वयात लतादीदींनी घराची जबाबदारी घेतली. मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वांत मोठ्या होत्या. आपल्या भावंडांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी लग्न केले नाही. संगीत-कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल लता मंगेशकर यांना 1969मध्ये पद्मभूषण, 1999मध्ये पद्मविभूषण आणि 2001मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके व इतरही पुरस्कारही प्रदान करण्यात आले होते.

लतादीदींच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी -पंतप्रधान मोदी

लतादीदींच्या निधनाचे वृत्त ऐकले. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. अत्यंत दयाळू, मृदू स्वभावाच्या लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. येणार्‍या पिढ्या लता मंगेशकर यांचे एक दिग्गज म्हणून कायमच स्मरण ठेवतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपल्या मधुर आणि कोमल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या लता मंगेशकर यांचा आवाज ही त्यांची दैवी देणगी होती, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

-सर्व स्तरांतून शोक व्यक्त

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. लतादिदींचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून पेडर रोड येथील यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी आणण्यात आले होते. तेथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

-मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करीत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली तसेच मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान आदींनीही श्रद्धांजली वाहिली.

-दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारकडून देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यातही मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

-शतकातून असा कलाकार जन्म घेतो -राष्ट्रपती 

लतादीदींचे जाणे हे माझ्याप्रमाणे त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचे सौंदर्य मांडले. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व भारावून टाकणारे होते. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे, पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करीत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहीत असूनदेखील तो दिवस येऊच नये असे वाटत होते. लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते, असे राज्यपालांनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांच्यासारखे त्यांच्यापूर्वी आणि नंतरही कोण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यांचे युग 1940पासून सुरू झाले होते. ते आजही सुरूच होते. त्यांनी संगीत क्षेत्रात केलेलेे काम दुसरे कोण करू शकत नाही. शब्दाची भावना समजून त्या गात होत्या.

-जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार

लतादीदींसारखे गाणारे ना कोणी झाले आणि ना कोणी होणार. आता आम्हा लोकांना काय-काय करावे लागत नाही. त्यांनी फक्त संगीताचा सराव केला. संपूर्ण आयुष्य संगीताला अर्पण केले. त्या जगातील संगीताची प्रेरणा मानल्या जातात. त्यांच्यासोबत काम करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

-ए. आर. रेहमान, संगीतकार

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन ही सर्वांत दुखद घटना आहे. या संगीतक्षेत्रातील मोठी हानी असून एक पोकळीच निर्माण झाली आहे. स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहणार. त्यांचासोबत गाणे गाण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

 -उदित नारायण, ज्येष्ठ पार्श्वगायक

खूप अंत:करण जड झाले आहे. जीवनात लताबाई नसत्या तर माझे जीवन वाळवंटासारखे झाले असते. त्यांचा सूर दैवी, सात्विक होते. सार्‍या श्रोत्यांना पोरके केल्यासारखे वाटते. आपल्या गाभार्‍यातून देव निघून गेल्यासारखे वाटतेय.

 -आरती अंकलीकर-टिकेकर, ज्येष्ठ गायिका

आज जीवन पोरके झाल्यासारखे वाटते. पांडुरंगाला विठू माऊली म्हणतो तसे लता मंगेशकर या आमच्यासाठी स्वरमाऊली होत्या.

-राहुल देशपांडे, शास्त्रीय गायक

 

वैयक्तिक नुकसान आणि शोक यांची खूप खोल भावना जाणवत आहे. अनेक दशकांपासून असंख्य आठवणी दिल्याबद्दल सदैव ऋणी.  -महेश काळे, शास्त्रीय गायक

 

लाखो शतकांचा आवाज आपल्याला सोडून गेला. त्यांचा आवाज आता स्वर्गात गुंजेल! शांतीसाठी प्रार्थना…

-अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते

 

लतादीदींच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांच्या जाण्याने माझ्यातला एक भागही हरवला आहे.

-सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply