Breaking News

माणुसकीचे नाते लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब!

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, माणुसकी म्हणजे निःस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब!

नावाप्रमाणेच नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. गरिबीची जाण असणारे गोरगरिबांचे उद्धारकर्ते, समस्यांचे मूळ माहित असल्याने आपल्या व्यापक दूरदृष्टीतून समस्या निवारण करणारे व्यासंगी लोकनेते रामशेठ ठाकूर अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्यानंतर ‘लोकनेते’ ही पदवी जनतेने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनाच दिली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सत्तेची दारे नेहमीच उघडी राहिली, याला कारण त्यांचे समाजकारण. प्रत्येक कामात उत्कृष्टता यायला हवी हा त्यांचा आग्रह असतो म्हणूनच राजकारणापलिकडे जाऊन शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा ज्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला तेथे उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली आहे.

लोकसभा, विधानसभेची असो महापालिकेची कोणतीही निवडणूक न लढवण्याची घोषणा करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हेच ’किंग’मेकर ठरतात.  विषय जिथे गंभीर तिथे लोकनेते रामशेठ ठाकूर खंबीर! त्यामुळे कोणतेही प्रश्न सोडविले जातात. याचमुळे निकटवर्तीय त्यांना ’सुप्रीम कोर्ट ’असेही संबोधतात. शिक्षणातूनच क्रांती घडते, असा ठाम विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून खूप मोलाचे कार्य उभे केले आहे. ही त्यांची स्वतःची संस्था असली तरी रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे, या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटूंबीय कार्य करीत आहेत. रयत आणि ठाकूर कुटूंबीय यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. त्या अनुषंगाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ साकारले आहे आणि खर्‍या अर्थाने हा समाजातील सर्व घटकांचा सन्मान असून भावी पिढीसाठी ही आदर्श वास्तू प्रेरणादायी ठरणार आहे.

सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या संस्थांची कामगिरी अतुलनीय अशी असल्यामुळे रायगड जिल्ह्याचा विषय असेल तेव्हा लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी तो जोडला जातोच. सामान्य नागरिक ते लोकनेता हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असा आहे. कोणतेही सत्ता पद नसताना लोकसभेवर निवडून जाणे हे भल्याभल्यांना जमत नाही. फक्त आपल्या कर्तृत्वाच्या आणि दातृत्वाच्या बळावर लोकनेते रामशेठ ठाकूर हे दोनदा खासदार झाले. आपली ख्याती सर्वदूर पसरली आहे हे माहिती असून त्यांनी कधी ‘मी’पणा बाळगला नाही. आजही खासदारकीच्या वेळी झालेल्या विकासकामांची चर्चा रायगड जिल्ह्यातील गावागावात ऐकायला मिळते आणि त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गौरव आवर्जून असतो. राजकीय क्षेत्रात नेत्यांची कमरता भासत नाही, परंतु त्यांच्या पाठीमागे किती जनाधार असतो हा संशोधनाचा भाग आहे. जनतेचे पाठबळ असलेले नेते राजकारणात फारच दुर्मिळ असतात. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर जनाधार असलेले लोकनेते आहेत. समाजकारणी, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरुवातीपासून अंगिकारले आहे. साहेबांकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही. अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम साहेब करतात.

जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणांचे बाळकडू त्यांना लहान वयातच आई-बाबांकडून मिळाले होते. जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना शिक्षणाविषयीची आस त्यांनी जागृत ठेवली. रयत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने मदतीचा हात देऊ केला आहे. आज त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत असून रयत शिक्षण संस्थेनेही त्यांचे नाव अनेक विद्यालयांना देऊन त्यांच्या कार्याची पावतीच दिली आहे. कष्टकरी, गोरगरिब घरातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून उभे केलेल्या इंग्रजी शाळा, सीकेटी महाविद्यालयांमुळे तळागाळापर्यंत इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षण पोहचले आहे. समाजातील सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी सतत पुढे राहणे, प्रसंगी स्वजनांशी संघर्ष करणे हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा स्थायीभावच. सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी, प्रामाणिकपणा, अचूक निर्णय क्षमता, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा या गुणांमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजजीवनातील यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत.

राजा म्हटले की, रयतेला सांभाळून घेणारा, त्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, मदत करणारा, असा असावा. पनवेल-उरण हे जर संस्थान असते, तर खरंच या संस्थानचे राजे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव असते. त्यांनी जे काही मिळवले आहे ते संघर्ष करून मिळवले आहे. राजकारणात आल्यानंतर काही जण समाजकारण कमी आणि राजकारणच अधिक करतात, पण रामशेठ याला अपवाद ठरले. कोणत्याही पक्षाचा गरजवंत व्यक्ती त्यांच्या दरबारात मदतीसाठी पोहचला आणि तो रिकाम्या हाताने परत येणे शक्य नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी यालाच ते प्रमाण मानतात. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचे काम, साधेपणा आणि निर्मळपणा त्यांच्यात भरलेला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने मोठ्या मनाचे ’राजा माणूस’ आहेत.

न्हावा गावात सामान्य कुटूंबात जन्मलेले रामशेठ ठाकूर यांनी शिक्षक, उद्योजक ते खासदार असा प्रवास करीत राजकारणात प्रवेश केला. समाजसेवेची आवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन वेळा खासदार म्हणून रायगडचे प्रतिनिधित्व केले. मुळात समाजसेवेचा पिंड असल्यामुळे त्यांनी तेथेही विविध प्रकारच्या योजना व निधी आणत रायगडचा झंझावाती विकास साधला.

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ या कर्मवीरांच्या संदेशाप्रमाणे शिकले आणि कमवून ते उद्योगपती झाले. त्यांनी दानधर्म केले, त्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण संस्था स्थापन करून मुंबई विद्यापीठाच्या रांगेत मानाचे स्थान मिळविले. उलवे नोडमध्ये जागतिक किर्तीचे क्रीडासंकुल उभारून मानाचे स्थान मिळविले. अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांची सेवा केली. मंदिरे, शाळा, क्रीडांगणे, समाजमंदिरांना आर्थिक मदत दिली. शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे आणि त्या अनुषंगाने 95 गावांतील प्रकल्पग्रस्त एकसंघ करण्याचे श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनाच जाते. दि. बा. साहेबांच्या इच्छेप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची आग्रही भूमिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांची राहिली आहे, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर जेव्हा जेव्हा अन्यायाची वेळ येते तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर कसलीही तमा न करता धावून जातात.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा माणसावर अधिक विश्वास आहे. एक गोष्ट खरी आहे की, हाडा-मांसाच्या माणसावर, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांची अधिक श्रद्धा आहे. माणसाच्या अंगात असलेल्या सामर्थ्याचा, कर्तृत्वशक्तीचा, चांगुलपणाचा प्रत्यय ते चांगले जाणतात. माणसाने ठरविले तर आकाशाला भिडणारे मोठेपण त्याच्या अंगी येऊ शकेल, असा त्यांचा आत्मविश्वास आहे, फक्त माणसाच्या ठायी असायला हवा तो दृढ निश्चय. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात कर्तृत्व गावजविणारी माणसे भेटली आणि त्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगले विचार त्यांनी घेतले. आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांना जो लौकिक मिळाला त्याचे श्रेय कुणा एका व्यक्तीला न देता परिस्थितीला द्यावे लागेल, परिस्थितीनेच त्यांना घडविले. त्यांच्या मातोश्री भागूबाई, पिताश्री चांगू ठाकूर व सासरे जनार्दन भगत साहेबांचे आशीर्वाद त्यांना लाभले. प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीशक्ती असते. ती शक्ती त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी दिली. पुढील कार्याला साथ लाभली ती आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर या सुपुत्रांची. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन ते नेहमी कार्यरत राहिले आहेत. माणुसकी व कर्तव्याची जाण ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी लावण्याचे ठरवले आणि त्यांनी तसे केलेही. गरीब-गरजूंना मदत, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांना भरघोस मदत, रूग्ण, खेळाडूंना सहकार्य, आपत्ती, दुष्काळ, अनेक घटकांना मदत हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दानशूरपणा अजूनही सुरू आहे. म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर राजकीय व आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून ते सुपरिचित आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य असणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेच्या लहान- मोठ्या शाखांचे व रयत सेवकांचे आदर्श आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये लोकनेते या पदाला पोहचलेल्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच व्यक्ती आहेत, त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आदराने नाव घेतले जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतिशील विचारांचा समृद्ध वारसा ते पुढे नेत आहेत. त्यांच्यातील दातृत्व या असामान्य गुणामुळे संपूर्ण महाराष्टाच्या जीवनात आदरयुक्त स्थान आहे. साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांनी अंगिकारलेले तत्व सर्वांना प्रेरणादायी ठरते. त्यामुळे सर्व स्तरांतील माणसांच्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराचे

स्थान आहे. सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त निरोगी व दीर्घायुष्य लाभो ही साईचरणी प्रार्थना!

-हरेश महादेव साठे, प्रसिद्धी प्रमुख, पनवेल

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply