खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
द्रुतगती मार्गावरील बोरघाटातप्रवाशी एसटी बस व मालवाहतूक ट्रक यांच्यामध्ये सोमवारी (दि. 6) दुपारी अपघात झाला. यात बसमधील एकूण नऊ प्रवाशी जखमी झाले. त्यांच्यावर खोपोली व पवना येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. फलटण स्वारगेट मार्गे बोरिवली ही राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच-14,बीटी-4436) सोमवारी दुपारी बोरघाटातून द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जात होती. खोपोली बायपासजवळ मालवाहू ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठिमागून येणारी एसटी बसने ट्रकला धडक दिली. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यापैकी नऊ प्रवासी जखमी झाले. त्यात तीन महिला, दोन मुले व चार पुरुष आहेत. महामार्गावरील यंत्रणा व खासगी वाहनांनी प्रवास करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. बसमधील उर्वरित प्रवाशांना महामार्ग पोलिसांनी अन्य वाहनाने मुंबईकडे रवाना केले. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.