Breaking News

हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी

आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाबाबत क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून सविस्तर माहिती घेतली असता मुख्य धरणाची बहुतांश कामे पूर्ण झालेली असून भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रियादेखील पूर्ण झालेली आहेत. धरणाची घळभरणी सन 2000 सालीच पूर्ण झालेली आहे. असे असतानादेखील कालव्याची कामे अद्यापपर्यंत न झाल्यामुळे गेल्या 20-22 वर्षांपासून होत असलेल्या पाणीसाठ्याचा प्रत्यक्ष लाभ लाभधारक शेतकर्‍यांना मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. या अनुषंगाने आता प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेऊन कालमयदित प्रकल्प पूर्ण करावेत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली असता कामांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्पाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. सन 2022-23मध्ये प्रकल्पाची तांत्रिक छानणी पूर्ण झालेली आहे. महामंडळाने प्रस्ताव जानेवारी 2023मध्ये शासनास सादर केलेला आहे. प्रकल्पास सर्व वैधानिक मान्यता प्राप्त आहेत तसेच शासन स्तरावरील तांत्रिक तपासणीदेखील अंतिम टप्प्यात आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पाच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आपल्या स्तरावरून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हेटवणे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पेण तालुक्यातील 45 गावांच्या चार हजार 268 हेक्टर क्षेत्रास सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत सुविधा उपलब्ध होणार असून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे त्यामुळे प्रकल्पाची निकड लक्षात घेता प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळात बैठकीत ठेवण्याकरिता संबंधितास निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply