Breaking News

विरोधकांचे स्वप्नरंजन

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ या नव्या प्रयोगाने ढवळून निघाले आहे. अर्थात या नव्या नाट्यप्रयोगामध्ये नवीन असे काही नाही. किंवा, त्या नाट्यकल्पनेला वास्तवाचादेखील काही आधार नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी आपले मनोरंजन तेवढे करून घेतले असेल.

गेले काही दिवस महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लाभणार अशी आवई विरोधकांकडून उठवली जात होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुठल्याही क्षणी येईल आणि तो येताच शिंदे सरकार पडेल, अशा प्रकारचे हे स्वप्नरंजन होते. शिंदे-फडणवीस सरकार हे केवळ काही तासांचेच सोबती आहे, असे भाकित छातीठोकपणे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यातच ठाण्यात केले होते. असे काहीबाही बोलून त्यांनी आपले हसे तेवढे करून घेतले. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा सकाळचा मॅटिनी शो रोज नवनव्या आवयांना किंवा अफवांना जन्म देणारा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार लवकरच भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उलटसुलट विधाने करून त्यात भरच घातली. इतकेच नव्हे तर पक्षाच्या मुखपत्रामध्ये रोखठोक लेख लिहून अजित पवार यांच्याबद्दलच्या अफवेवर शिक्कामोर्तबच केले. खुद्द अजित पवार यांनी वारंवार खुलासे करूनही त्यांच्याबद्दलची चर्चा अद्याप थांबलेली नाही. विशेष म्हणजे ज्या भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत असे म्हटले जाते, त्या भाजपमधील एकाही नेत्याने त्याला ना कधी दुजोरा दिला, ना कधी चर्चेला खतपाणी घातले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे अशी जोरदार चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मुख्यमंत्री शिंदे दोन-तीन दिवसांसाठी सातार्‍याजवळील आपल्या गावी सुटीवर गेले, त्याचीही प्रचंड चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे सत्तेवर असताना ज्या पक्षाचे मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर देखील पडले नव्हते, त्यांच्याच नेत्यांनी मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याची आवई उठवणे हा एक विनोदच म्हणायला हवा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, अशी ग्वाही स्वच्छ शब्दांत दिली. त्यामुळे तरी आता ही चर्चा थांबावी. गेले काही दिवस गावोगाव विविध पक्षांकडून प्रचंड प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे. आपापल्या पक्षाच्या लाडक्या नेत्याचे होर्डिंग लावून त्यावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्याचे प्रकार पुणे, नागपूर आणि काही प्रमाणात मुंबईत दिसून आले. अर्थात यामागे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह होता हे वेगळे सांगायची गरज नाही. प्रत्येक पक्षाला आपला ज्येष्ठ नेता कधी ना कधी मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. किंवा, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघण्यातही काहीच गैर नाही. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर भाजपमधील अनेक कार्यकर्ते काहिसे अस्वस्थ झाले होते हे खरे कारण त्यांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी हवे होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनादेखील अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायला आवडेल, परंतु कार्यकर्त्यांच्या आवडी निवडीपेक्षा निवडणुकीतील गणिते अधिक महत्त्वाची ठरतात. शिंदे-फडणवीस सरकार सध्या गतिमान कारभार करीत आहे. यात विघ्न आणण्याचे स्वप्न विरोधकांनी पाहू नये.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply