मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 20) मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. भाजपचे पाच, तर आघाडीचे सहा (शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन) उमेदवार मैदानात आहेत. विधान परिषदेसाठी भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या पाठिंब्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र खोत यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीतील शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे स्थानिक नेते आमश्या पाडवी यांना, राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना, तर काँग्रेसने वरिष्ठ नेते भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता, तर पुरेसे संख्याबळ नसूनही भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.