म्हसळा : प्रतिनिधी
म्हाप्रळ-आंबेत-पुरार या राज्यमार्गावरील आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 4) काढला आहे. या पुलाच्या दोन्ही पोचमार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोखंडी कमान उभारण्यात येणार आहे. या पुलावरून जाण्यास दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जिपव्यतिरिक्त बस, ट्रक, टेंपो आदी अवजड वाहनांना बंदी असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील कार्यकारी अभियंत्यांनी कोकण भवन नवी मुंबई येथील संकल्पचित्र मंडळ (पूल) अधीक्षक अभियंता यांच्यासोबत केलेल्या आंबेत पुलाच्या संयुक्त पाहणीत पुलाचे स्टील पूर्णपणे गंजले असून, ते उघडे पडले आहे, तसेच बेअरिंग पेडस्टला भेगा पडल्या असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी पूल कमकुवत स्थितीत असून पुलावरील अवजड वाहतूक बंद करून फक्त 20 मे. टनापर्यंत वजनाची वाहतूक धिम्या गतीने सुरू ठेवावी, अशा सूचना केल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सदरची अधिसूचना काढली आहे. रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल 376 मीटर लांबीचा आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ गावाला जोडणारा हा आंबेत पूल गेल्या सात-आठ महिन्यांपासून अत्यंत धोकादायक झाला असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. त्यातच पुलाखाली नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा होत असल्याने पुलाचा धोका वाढला होता. महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत आहे, अशा आशयाचे फलक लावले होते. त्याकडेही चालक दुर्लक्ष करीत असत. त्यामुळे आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.