Breaking News

शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पेणमध्ये निदर्शने

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक

पेण ः प्रतिनिधी

प्रोटोकॉल सांगत पोलीस अधिकार्‍याला खुर्चीतून उठविल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात रविवारी (दि. 19) पेण येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकार्‍याची माफी मागावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली. काही दिवसांपूर्वी पेणमधील प्रांत कार्यालयात प्रस्तावित एमआयडीसीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे आमदारांच्या रांगेत प्रांताधिकारी विठ्ठल इमानदार यांच्या शेजारी खुर्चीत बसले होते. यावरून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना प्रोटोकॉलची आठवण देत खुर्चीतून उठावयास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांचा अपमान करणार्‍या आमदार जयंत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत रविवारी पेण येथील रायगड बाजारजवळील रस्त्यावर संघटनेचे संस्थापक राहुल दुबाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मंदार चितळे, सेक्रेटरी हरिश्चंद्र तांडेल, पेण तालुकाध्यक्ष योगेश म्हात्रे, शहराध्यक्ष प्रणेश पोवळे आदींसह पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.  या वेळी बोलताना संघटनेचे संस्थापक राहुल दुबाळे यांनी सांगितले की, जनतेच्या संरक्षणार्थ पोलीस सतत आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे एखाद्या पोलिसाचा अशा प्रकारे अपमान होणे ही निषेधार्ह घटना असून या प्रकरणी आमदार जयंत पाटील यांनी माफी मागावी; अन्यथा येत्या आठ दिवसांत त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सत्कार करू असेे.पोलिसांचा अपमान सहन केला जाणार नाही. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून त्यांनी या प्रकरणात योग्य लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचेही दुबळे यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply