अलिबाग : प्रतिनिधी
पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेल्या सात पर्यटकांचा काळ आला होता पण वेळ आली नसल्याने ते सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडत असलेल्या सात पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षक आणि एटीव्ही चालकांना यश आले आहे.
पुणे येथून सूर्यकांत शिंदे, रोहित गाडगे, सतीश भुजबळ, अपेक्षा शिंदे, कावेरी भुजबळ आणि अजून दोन जण अलिबाग येथे पर्यटनास आले होते. रविवारी (दि. 19) सकाळी 11.30 वाजता सातही पर्यटक अलिबाग समुद्रावर आले होते.
या वेळी समुद्रस्नानाचा मोह त्यांना आवरला नाही आणि सर्वजण समुद्रात पोगण्यास गेले, मात्र त्याचवेळी समुद्राला भरती सुरू झाली होती. याच ठिकाणी हे पर्यटक पोहत होते, मात्र भरतीचे वाढते पाणी आणि खोलगट भागाचा अंदाज न आल्याने सातही जण बुडू लागले. ते जीवाच्या आकांताने वाचण्यासाठी धडपड करीत होते.
पर्यटक बुडत असल्याचे समुद्रकिनार्यावर असलेल्या जीवरक्षक आणि एटीव्ही बाईक चालकांना लक्षात आल्यावर तातडीने बंड्या सारंग, दिपक ढोले, जतेश सारंग, अमित पेरेकर, सचिन खोत, अबू, बबन भगत यांनी समुद्रात उड्या मारून त्याचे प्राण वाचविण्यासाठी गेले. प्रसंगावधन दाखवून या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.