सुधागडात गाबोळीच्या माशांना अधिक पसंती
पाली : प्रतिनिधी
समुद्रातील मासेमारीवर बंद असल्याने खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. सुधागड तालुक्यातील बाजारांत सध्या गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून, त्यातील गाबोळीच्या (पोटात अंडी असलेल्या) माशांना अधिक पसंती दिली जात आहे. बाजारात विक्रीस आलेले गाबोळीचे मासे हातोहात संपत आहेत.
सुधागड तालुक्यात नदी, तलाव, धरण, ओढे तसेच शेतात साठलेल्या गोड्या पाण्यात सापडणार्या माशांची आवक वाढली आहे. त्यामध्ये मळे, कोलीम, शिवडा, डाकू मासे, अरलय, वाम, मोठी कोलंबी, कटला, शिंगटी, चिवण्या, खवल आदी माशांचा समावेश आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 20 ते 30 टक्क्यांनी किमती वधारल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीस सापडणार्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी असतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळीचे मासे म्हणतात. ही गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे पकडतात.
सध्या गोड्या पाण्यातील मासे मुबलक मिळत आहेत. बहुतांश माशांमध्ये हमखास अंडी असतात. हे मासे खूप चविष्टदेखील असतात. या हंगामात विविध प्रकारचे गोडे पाण्यातील मासे खाणे पसंत करतो.
-सुलतान बेणसेकर, खवय्या, पाली, ता. सुधागड
उधवण किंवा वळगणीच्या माशांना मागणी
जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात किंवा ओहळात अंडी देण्यासाठी येतात. या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात. वळगणीचे मासे पकडण्यासाठी जाळे, पाग, लोखंडी तलवार आदी साधनांचा वापर केला जातो.