पनवेल : वार्ताहर
खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर हाय माध्यमिक शाळेमध्ये घुसलेल्या एका चोरट्याने शाळेच्या रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच क्रिडांगणाच्या कोपर्यात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्याची हि चोरी कैद झाली असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेतील चोरट्याने खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर या शाळेच्या कंपाऊंडवरुन उडी टाकून शाळेत प्रवेश केला होता. त्यानंतर सदर चोरट्याने शाळेतील रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, तसेच रिसेप्शन ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेला लॅपटॉप चोरुन नेला. शाळेच्या रिसेप्शन विभागात काम करणारी महिला आल्यानंतर त्याठिकाणी असलेला एलईडी टीव्ही व लॅपटॉप चोरीला गेल्याचे तीच्या निदर्शनास आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने शाळेतील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, शाळेच्या कंपाऊंड वॉलवरुन उडी टाकून आलेल्या चोरट्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले.