Breaking News

वरुणराजाचा बळीराजाला दिलासा

अलिबाग : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. 20) सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे सर्वाधिक  65 मिमी पावसाची नोंद झाली. 20 तारखेपर्यंत सरासरी 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

यंदा मान्सून काहीसा उशीराने दाखल झाला. पावसाआभावी शेतीची कामे रेंगाळली होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चांगल्या पावासाला सुरवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टी तर तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस अलिबाग येथे पडला. तिथे 65 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल श्रीवर्धन येथे 60 मिमी, माथेरान येथे 52 मिमी, मुरूडला 36 मिमी, खालापुरमध्ये 36 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. माणगाव येथे सर्वात कमी म्हणजेच तीन मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दुबार पेरणीचे संकट टळले; शेतीकामांना आला वेग

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील भात पेरणी जवळपास पुर्ण झाली आहे, मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागते की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मागील दोनतीन दिवसांपासून  पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने भात पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकट काहीअंशी तरी टळले आहे.

रोहा तालुक्यातील धाटाव पंचक्रोशी, सुतारवाडी, चणेरा, खांब, वाली, पुई, पुगाव, धानकान्हे, यशवंत खार, मेढा या विभागातील पेरणी पुर्ण झाली असल्याने शेतकर्‍यांची इतर मशागतीची लगबग सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसापासून  पाऊस नसल्याने बळीराजाचे डोळे पाणावले होते. मात्र वरुण राजा शेतकर्‍यांच्या मदतीला धाऊन आला. रोहा तालुक्यात रात्रीपासूनच पावसाने संततधार लावल्याने शेतांमध्ये पाणी साचलेले दिसून येत आहे.

यंदा मोसमी पावसाचे आगमन वेळेवर झाले नसले तरी रविवार व सोमवारी रोहे तालुक्यात बर्‍यापैकी पाऊस झाला. शेतीसाठी हे अनकूल वातावरण आहे. काही ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आली आहेत.

-रुपेश देवजी शिंदे, शेतकरी, तळाघर, ता. रोहा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply