भाजपच्या माधुरी सुतार यांचे आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
शिरवणे गाव गावठाण भागात मागील दोन महिन्यांपासून दूषित, पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणार्या पाणीपुरवठाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी विनंती केली आहे. सुतार यांनी निवेदनात म्हटले की, शिरवणे गाव, गावठाण, नेरूळ सेक्टर 1 येथील स्थानिक रहिवाशांना मनपा पाणीपुरवठा विभागाकडून होत मागील दोन महिन्यांपासून दूषित आणि पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपाच्या पाणी पुरवठा अधिकारी, वॉर्ड अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. अधिकार्यांना प्रभागात आणून पाणी समस्याबाबत अवगत केले. पाण्याची पाइपलाइन तुटली आहे का? याचाही शोध घेतला पण मनपाकडूनच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत येते. याबाबत मनपाचे संबंधित अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. मनपा सोडत असलेले पाणी काही ठिकाणी 10 मिनिटेच येते, तर विद्युत मोटार लावूनही उंच टेकडीवर असलेल्या घरात, इमारती तर येणारे पाणी फारच कमी दाबाने येत असल्याचे माधुरी सुतार यांनी सांगितले. या समस्येसाठी पाहणी दौरा काढावा, अशी विनंती आयुक्तांना माधुरी सुतार यांनी केली आहे.