Breaking News

रेल्वे प्रवाशांना सेवा-सुविधा मिळणार

पनवेल : वार्ताहर

पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सेवा-सुविधा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटीची बैठक सेंट्रल रेल्वेच्या डीसीएम यांच्यासोबत बुधवारी (दि. 22) झाली. कमिटीच्या सदस्यांनी प्रवाशांना उद्भवणार्‍या अडचणी व समितीच्या सूचना असणारे निवेदन दिले. यातील मुद्दे विचारात घेऊन त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन डीसीएम यांनी दिले. सेंट्रल रेल्वेचे डीव्हीजीनल कमर्शिअल मॅनेजर एम. एल. मीना यांनी स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटीच्या सदस्यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच आगामी काळात होणार्‍या विकास प्रकल्पाबाबत सदस्यांना अवगत केले. समितीचे उपाध्यक्ष यशवंत ठाकरे यांनी प्रास्ताविक सादर केले. जनरल सेक्रेटरी श्रीकांत बापट, सहाय्यक सेक्रेटरी निलेश जोशी, रमेश जानोरकर, डॉ. मधुकर आपटे, पत्रकार मंदार दोंदे, विलास दातार, सरीता पाटणकर यांनी प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या वेळी स्टेशन मास्तर जे. पी. मीना, सी. सी. आय, ए. पी. मीना, स्टेशन मास्तर (कमर्शियल) सुधीर कुमार, रेल्वे पोलीसचे वरिष्ठ निरीक्षक पालवी, आरपीएफचे राणा, रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या सार्‍या समस्या समजून घेतल्यानंतर मीना यांनी स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटीच्या सूचना आणि तक्रारी वरिष्ठ पातळीवर पाठवणार असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

चोर्‍यांबाबतही बैठकीत चर्चा

पनवेल रेल्वेस्थानकातील चोर्‍यांबाबत मुद्दा उपस्थित केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालवी यांनी सध्या फक्त 60 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती दिली तसेच संपूर्ण स्थानक परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी 122 कॅमेर्‍यांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply