केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा विश्वास; मतदारांचे आभार मानण्यासाठी महाडमध्ये मेळावा
महाड : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला भरभरुन मतदान केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मोठी आघाडी मिळेल. त्यामुळे या निवडणूकीत आपला विजय निश्चीत आहे, असा विश्वास केंद्रिय मंत्री अनंत गीते यांनी महाडमध्ये व्यक्त केला. महाड विधानसभा मतदार संघातील मतदारांचे आभार माणन्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ना. गीते बोलत होते. शिवसेनेत राहून पक्षविरोधी कारवाई करणार्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. दरम्यान, उमेदवार गीते आणि महायुतीच्या पदाधिकार्यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीच्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूकीत मनापासून महायुतीचे काम केले, त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे नामदार अनंत गीते म्हणाले. महाड विधानसभा मतदारसंघातून नामदार अनंत गीते यांना मतांची मोठी आघाडी मिळाल्याचे मतमोजणीत स्पष्ट होईल, असे सांगून आमदार भरत गोगावले यांनी, या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांची उणीव भासल्याची कबुली दिली. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, शिवसेनेचे महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक, पोलादपूर तालुका प्रमुख निलेश आहिरे उपतालुका प्रमुख संजय मोदी, राजीप सदस्य मनोज काळीकर, संजय कचरे, जितेंद्र सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राउळ, विधानसभा संपर्क प्रमुख सुभाष पवार, प्रतिभा पवार, राकेश मोरे, यांनीही या मेळाव्यात आपले विचार व्यक्त केले.