Breaking News

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी

मित्रपक्षांना डावलले; शपथविधी सोहळ्याकडे नेत्यांची पाठ

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (दि. 30) विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्याबरोबरच शपथविधी सोहळ्याचे साधे आमंत्रण न देण्यात आल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करीत या सोहळ्याकडे पाठ फिरविली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रमुख पक्षांमध्येच धुसफूस असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अवघ्या सहा मंत्र्यांसह सरकार सामोरे गेले. त्यावरून विरोधी पक्षाने टीका केली होती. अनेक चर्चा झडल्यानंतर अखेर महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची, तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आणि 10 सदस्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार स्थापन होताना मित्रपक्षांना आवश्यक तो मान-सन्मान देण्याचा शब्द तिन्ही प्रमुख पक्षांकडून देण्यात आला होता. त्यामुळे मित्रपक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. एवढेच नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, लोकभारती, भाकप, बहुजन विकास आघाडी, पीआरपी यापैकी कुठल्याही पक्षाला आमंत्रण दिले गेले नव्हते. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. ’सरकार स्थापन होईपर्यंत आम्हाला विचारात घेतले जात होते. सरकार स्थापन झाल्यानंतर मित्रांचा विसर पडला, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संतोष शेट्टी यांनी दिली. त्यांच्यासह अन्य घटकपक्षांच्या नेत्यांनी आमंत्रण नसल्याने शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविली. शेतकरी नेते बच्चू कडू वगळता इतर घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान नाही. त्यामुळे घटकपक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत.
यांचा झाला शपथविधी
उपमुख्यमंत्री : अजित पवार (राष्ट्रवादी) कॅबिनेट मंत्री : अशोक चव्हाण (काँग्रेस), दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी), धनंजय मुंडे, राष्ट्रवादी, विजय वडेट्टीवार (काँग्रेस), अनिल देशमुख (राष्ट्रवादी),  हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), वर्षा गायकवाड (काँग्रेस), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), नवाब मलिक (राष्ट्रवादी), राजेश टोपे (राष्ट्रवादी), सुनील केदार (काँग्रेस), संजय राठोड (शिवसेना), गुलाबराव पाटील (शिवसेना), अमित देशमुख (काँग्रेस), दादा भुसे (शिवसेना), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), संदिपान भुमरे (शिवसेना), बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी), यशोमती ठाकूर (काँग्रेस), अनिल परब (शिवसेना), उदय सामंत (शिवसेना), के. सी. पाडवी (काँग्रेस), शंकरराव गडाख (अपक्ष), असलम शेख (काँग्रेस), आदित्य ठाकरे (शिवसेना); राज्यमंत्री : अब्दुल सत्तार (शिवसेना), सतेज उर्फ बंटी पाटील (काँग्रेस), शंभूराजे देसाई (शिवसेना), बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पार्टी), विश्वजीत कदम (काँग्रेस), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी), आदिती तटकरे (राष्ट्रवादी), संजय बनसोडे (राष्ट्रवादी), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष).
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू
महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्याच मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशी दोन मंत्रिपदे ठाकरेंच्या एकाच घरात गेली आहेत. दुसरीकडे अनेक नेत्यांना वगळल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचे सूर आहेत. मागील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या काही शिवसेना नेत्यांना या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. शिवसेनेने मागील मंत्रिमंडळातील दीपक केसरकर, रवींद्र वायकर, तानाजी सावंत, दिवाकर रावते, रामदास कदम यांना वगळले आहे, तर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही.
संजय राऊतांची दांडी
शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असून, मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही त्यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मी नाराज नाही, तसेच शासकीय कार्यक्रमाला जात नाही असे सांगून संजय राऊतांनी या विषयावर बोलणे टाळलेे. त्यांचे बंधू सुनील हेही शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यांचा फोनदेखील स्विच ऑफ होता. त्यामुळे नाराजीनाट्याचा अंक सुरू झाल्याचे चित्र आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply