शेअर बाजारातील सध्याचे चढउतार सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पेलवणारे नाहीत. अशावेळी अनेक भारतीय गुंतवणूकदार बाजाराच्या गुंतवणुकीपासून लांब जातात. अशागुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणुकीचा फायदा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने का आणि कसा घेतला पाहिजे?
यावर्षी जानेवारीत 61 हजार अंश पार करणाराशेअरबाजाराचा सेन्सेक्स पुढील सहाच महिन्यात म्हणजे जूनमध्ये सुमारे 10 हजारांनी म्हणजे 51 हजारांवर खाली आला. एवढेच नव्हे तर नंतरही अगदी कमी कालावधीत त्याने गुंतवणूकदारांना भीतीदायक असा लंबक दाखविला. एकाच दिवसात हजार, पंधराशे अंशांच्या गटांगळ्या किंवा तेवढीच तेजी तोदाखवितोआहे. जे शेअर बाजाराला सरावलेले आहेत किंवा पट्टीचे गुंतवणूकदार आहेत, ते हा धक्का पचवू शकतात, कारण त्यांच्याकडे अधिक भांडवल असल्याने शेअर बाजार पडला की शांत बसायचे, हे त्यांना माहीत असते. पण जे नवीन असतात, ते ही पडझड सहन करू शकत नाहीत. उलट, चांगलेशेअर याकाळात ते विकून टाकतात किंवा नवी खरेदी करण्याची घाई करून त्यात अडकून बसतात. तरकाही जण, नको ती शेअर बाजाराची वाट, असे ठरवून नंतर शेअर बाजाराचे नाव घेत नाहीत. पण त्यामुळे, महागाईशी स्पर्धा करू शकणारा परतावा देणार्या या गुंतवणुकीपासून ते दूर राहतात. शेअर बाजारातील गुंतवणूक इतर गुंतवणूक प्रकारांवर मात करते, असे म्हटले जाते आणि बहुतांश वेळा ते खरेच आहे. पण मग अशा गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील संपत्ती निर्माणाचा फायदा घ्यायचा नाही काय, असाप्रश्न पडतो.
शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा फायदा अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्याचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. जगभर लोकप्रिय असलेला हा मार्ग आता भारतीय नागरिकही प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागले आहेत. भारताच्या लोकसंख्येची तुलना करता हे प्रमाण अजून खूपच कमी असले तरी गेल्या तीन- चारवर्षांतील त्यातील वाढ अचंबित करणारी आहे. त्यातून हा गुंतवणूक प्रकार भारतातही वेगाने वाढत असल्याचे दिसून येते आहे. नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी तरी तेच सांगते. म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करणार्या भारतात 44 कंपन्या आहेत. सध्या त्या तब्बल 37 लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करतात. गेल्या पाच वर्षातील वाढ सरासरी 16 टक्के म्हणजे अतिशय चांगली आहे. पण मुळातच ती कमी असल्याने जीडीपीशी त्याची तुलना केल्यास ते प्रमाण 16 टक्के पडते, ज्याची जागतिक सरासरी 74 टक्के आहे. याचा अर्थ असा की विशेषतः विकसित देशांमध्ये गुंतवणुकीसाठी हा मार्ग एवढया मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शिवाय शेअर बाजाराच्या एकूण मूल्याचा विचार करावयाचा झाल्यास म्युच्युअल फंडाकडे असलेली मालमत्ता केवळ सहा टक्के आहे. हेच विकसित देशातील प्रमाण 33 टक्के आहे.
अर्थात, गेल्या काही वर्षातील वाढ लक्षात घेता हे प्रमाण असेच वाढत जाईल आणि हा गुंतवणुकीचा प्रकार स्वीकारण्याची संख्या वेगाने वाढत जाईल, अशीच सध्याची सर्व आकडेवारी सांगते. उदा. चार पाच वर्षांपूर्वी एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला शेअर बाजारात आठ हजार कोटी रुपये येत होते, त्याचे प्रमाण सध्या 12 हजार कोटींवर पोचले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या सात आठ महिन्यात भारतीय शेअर विक्रीचा सपाटा चालू ठेवला आहे, ते भारतीय बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे बाजार यावर्षी सातत्याने खाली येत राहिला आहे. तरीही त्याची घसरण मर्यादित राहिली कारण म्युच्युअल फंडाच्या मार्गाने बाजारात गुंतवणूक करणारे भारतीय होय. कारण त्यांनी गुंतविलेली रक्कम ही विदेशी गुंतवणूकदारांनंतरची सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. त्यामुळेच भारतीय शेअर बाजाराचे एकूण मूल्य या काळात आठ टक्क्यांनी खाली आले असताना म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीने बाजाराला तारले आहे. गेल्या आर्थिक वर्षात तीन लाख कोटी रुपये या मार्गाने शेअर बाजारात आले, यावरून म्युच्युअल फंडांचे महत्व लक्षात येते. बाजार तुलनेने स्थिर राहण्यासाठी त्यात अशी खात्रीची भारतीय आणि संस्थात्मक गुंतवणूक वाढली पाहिजे.
पण अशी कितीही आकडेवारी दिली तरी बहुतांश भारतीय बाजारातील सध्याची ही पडझड सहन करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बाजारात जेव्हा तेजी असते आणि आपण किती कमी दिवसांत किती जास्त पैसे कमावले, असे आपल्या आजूबाजूचे लोक सांगू लागतात किंवा बाजारातील कमाईविषयीचे लेख प्रसिद्ध होऊ लागतात तेव्हा अशा कमाईचे आकर्षण वाटणे, हे अगदी साहजिक आहे. पण तुम्ही जर आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनुभव घेतला नसेल, तर त्याने अशा उच्चांकावर बाजार असताना थेट बाजारात कधीही गुंतवणूक करू नये. त्यामुळे अशा सर्वांनी आणि नव्याने शेअर बाजारातील गुंतवणुकीचा फायदा घेऊ इच्छीणार्यानी म्युच्युअल फंडाचाच मार्ग निवडला पाहिजे. याची पुढील काही कारणे आहेत.
- थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागते. मात्र म्युच्युअल फंडांत 500 रुपयांनीही सुरवात करता येते.
- बाजारात पाच हजारांवर कंपन्या आहेत. त्यातील कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करावी, हे वैयक्तिक गुंतवणूकदार पुरेशा अभ्यासाअभावी ठरवू शकत नाहीत. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापक पूर्णवेळ त्याचाच अभ्यास करत असतात. त्यामुळे शेअर बाजार पडतो, तेव्हा नुकसान मर्यादित होते.
- शेअर बाजार ही अधिक जोखीम असलेली गुंतवणूक आहे. जगातील अनेक घटनांचा त्यावर परिणाम होऊन बाजारात चढउतार होतातच. असे मोठे चढउतार सहन करण्याची नव्या गुंतवणूकदारांची तयारी नसते. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. बहुतांश म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशीच संबंधित असतात, पण हे चढउतार म्युच्युअल फंडात तेवढे धक्कादायक नसतात.
- दीर्घकालीन गुंतवणुकीचा संकल्प नव्या गुंतवणूकदारांनी केलेला असतो तरी ते बाजारातील चढउताराला घाबरून शेअर्सची खरेदी विक्री अधिक करतात. त्यामध्ये ब्रोकरेज, एसटीटी, असे कर जात असतात. म्युच्युअल फंडांची खरेदी विक्री करताना एवढे कर लागत नाहीत.
- शेअर बाजारातील थेट गुंतवणूक ही लिस्टेड कंपन्यांमध्येच किंवा इंडेक्समध्येच केली जाऊ शकते, मात्र म्युच्युअल फंडाच्या मार्गाने डेट, सोने, रियल इस्टेट अशा संपत्तीच्या इतर प्रकारातही गुंतवणूक करता येते.
- थेट गुंतवणुकीसाठी विशिष्ट कंपन्या निवडल्या आणि त्यांचे शेअर घेतले, तर त्यातील काही कंपन्यांचे भाव खूप खाली येवू शकतात. मात्र म्युच्युअल फंड व्यवस्थापक विशिष्ट कंपनीत जास्तीत जास्त (उदा. 10 टक्के) गुंतवणूक करू शकतात. याविषयी सेबीचे नियम अतिशय कडक असल्याने गुंतवणूकदार अशावेळी सुरक्षित रहातात.
- शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर कर द्यावा लागतो, तेवढा कर म्युच्युअल फंडातून झालेल्या नफ्याला द्यावा लागत नाही.
- थेट गुंतवणुकीत आपल्याकडील शेअरच्या किमतीतील चढउतारामुळे अस्वस्थता येवू शकते. पण म्युच्युअल फंड गुंतवणूक कोणत्या कंपन्यांत आहे, याच्याशी आपला थेट संबंध नसतो, त्यामुळे या चढउतारांचा थेट त्रास होत नाही.
- बाजारातील चढउतारांवर लक्ष ठेवून शेअर विकत घेणे किंवा योग्य वेळी त्यांची विक्री करणे, हे भल्याभल्यांना शक्य होत नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मात्र आपण आपल्या सोयीने हे व्यवहार करू शकतो. हे व्यवहार आता अॅपवरही होऊ शकतात.
- रिटायरमेंट फंड, चिल्ड्रेन फंड तसेच टॅक्स सेवर असेही फंड असल्याने त्या त्या उद्देश्यासाठी गुंतवणूक करण्याची संधी म्युच्युअल फंड देतात, पण थेट शेअर घेताना असे उद्देश्य पूर्ण होतीलच, असे खात्रीने म्हणता येत नाही. कारण थेट खरेदीविक्रीमध्ये जोखीम वाढते. कोरोनाच्या काळात अचानक कोसळलेला बाजार आणि आता युद्ध, महागाई आणि अमेरिकन फेडने लीक्वीडीटी कमी करण्याचा घेतलेला निर्णय, अशा कारणांनी शेअर बाजार अस्थिरच राहणार आहे. या चढउताराची सवय झाली की बाजार खाली आल्यावर आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढविली की परतावा वाढतो, जो थेट शेअरच्या खरेदी विक्रीतून मिळणार्या परताव्याशी स्पर्धा करू शकतो. मात्र, बाजार पडला की म्युच्युअल फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचे धाडस करता आले पाहिजे.
थेट शेअर खरेदी केल्यामुळे कंपन्यांचा मिळणारा डिव्हीडंड, बोनस शेअर, मतदानाचा अधिकार तसेच चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये होणार्या वाढीचा फायदा मिळतो. तो म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मिळत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.पण हे सर्व फायदे मिळविण्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास असायला हवा. असा अभ्यास असणार्या गुंतवणूकदारांनाही अनेकदा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. पण त्यांच्याकडे भांडवलाची कमी नसल्याने ते त्यातून मार्ग काढतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार मात्र त्या नुकसानीतून बाहेर येवू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांची जोखीम पेलण्याची क्षमता आहे, त्यांनी शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावी. मात्र ज्यांची सुरवात आहे, त्यांनी एसआयपीच्या मार्गाने आणि बाजार खाली आल्यावर रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवावी. किमान चार पाच वर्षे ही गुंतवणूक ठेवली तर चांगला फायदा मिळतो, असाच आतापर्यंत सर्वांचा अनुभव आहे.
-यमाजी मालकर, अर्थप्रहर