शेअरबाजार सोप्पा आहेअसं सर्वांनाच वाटतं.. खालच्या भावात खरेदी करायची अन वरच्या भावात विक्री.. त्यात काय अवघड आहे. परंतु ग्रेटर फूल थिअरीप्रमाणं प्रत्येक भावात कोणी ना कोणी खरेदीदार व विक्रीदार असतो आणि तो स्वतःला चलाख समजत असतो कारण खालच्या भावात विकणार्याला वाटत असतं की भाव अजून खाली येतील तर घेणार्याला वाटत असतं की इथून भाव वर जातील. मग यातून कसा मार्ग काढायचा?
दुरून डोंगर साजिरे ही एक म्हण आहे आणि या म्हणीचाजवळ जाता जाता द-या खोरी हा उत्तरार्ध प्रचलित आहे. परंतु या खोल द-या-खोर्यांस जर आपण जवळ केलं तर त्यातील आनंद शोधता येतोच. त्यांतील झुळुझुळणारे झरे, त्यांच्या काठानं बहरलेलं झाडाझुडुपांचं विश्व, त्यांच्या आधारानं विविध प्राणी व पक्षी यांचा होणारा मुक्त संचार.. अशी रम्य जागा जवळ जाऊन पाहतांना साजरी वाटत नसते कां? त्यांवर चढउतार करण्याचा कष्टाचा भाग सोसला तर तिथलं निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते. म्हणून तर सारी हिल स्टेशन्स इतकी लोकप्रिय असतात. कित्येक लोक मुद्दाम डोंगराळ भागात गिरीसंचाराला(ट्रेकिंगला) जातात.
तसंच, शेअरबाजार सोप्पा आहेअसं सर्वांनाच वाटतं.. खालच्या भावात खरेदी करायची अन वरच्या भावात विक्री.. त्यात काय अवघड आहे. परंतु ग्रेटर फूल थिअरीप्रमाणं प्रत्येक भावात कोणी ना कोणी खरेदीदार व विक्रीदार असतो आणि तो स्वतःला चलाख समजत असतो कारण खालच्या भावात विकणार्याला वाटत असतं की भाव अजून खाली येतील तर घेणार्याला वाटत असतं की इथून भाव वर जातील. त्याचप्रमाणं अगदी वरच्या भावात खरेदी करणार्यास वाटत असतं की भाव अजून वाढतील आणि तेंव्हा मी एखाद्या मूर्खास माझ्याकडील शेअर्स विकून टाकीन. हे चक्र अव्याहतपणे चालूच असतं आणि यालाच शेअर बाजार म्हणतात.
आता प्रश्न आहे की मग कोणत्याही कंपनीचा योग्य भाव कोणता ? वॉरेन बफे म्हणतात, रास्त कंपनी अफलातून किंमतीत घेण्यापेक्षा अफलातून कंपनी ही रास्त किंमतीत घेणं कधीही चांगलं आहे. परंतु 19 व्या शतकातील आयरिश कवी ऑस्कर वाईल्ड म्हणतात, उपेक्षावादी माणूस तो असतो ज्यास प्रत्येकाचे भाव माहीत असतात मात्र त्यांचं मूल्य ठाऊक नसतात. कारण शेअरची अंगभूत किंमत निश्चित ठरवता येऊ शकत नाही आणि म्हणूनच वॉरेन बफे यांचं अजून एक वाक्य नमूद करावसं वाटतं, ते म्हणजे, भाव जो तुम्ही देता आणि बदल्यात आपल्याला जे मिळतं ते मूल्य.
भाव आणि मूल्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाव व मूल्य यांच्यातील फरक समजून घेणं हे मूल्य गुंतवणूकीचं मुख्य तत्व आहे असं अनेक जण मानतात. मूल्य गुंतवणूक दोन प्राथमिक संकल्पनांशी संबंधित आहे- अवमूल्यन आणि अतिमूल्यांकन.
मूल्यामध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणुकदार एखाद्या समभागाला त्याच्या अंतर्गत मूल्यापेक्षा कमी किंमतीत व्यवहार होताना त्याकडे एक संधी म्हणून पाहतात तर दुसरीकडं जेंव्हा एखादा शेअर त्याच्या मूळ मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर व्यवहार करत असतो, तेंव्हा त्याचं अतिमूल्यांकन झालंय असं म्हटलं जातं. पुन्हा प्रश्न येतो की अशी कोणती किंमत की जी अंडरव्हॅल्यू म्हणून समजली जाऊ शकते? आणि ही किंमत ज्यास समजेल तो त्या किंमतीत शेअर घेईलच. मग असं कोणतं सूत्र आहे की ज्यामुळं ही रास्त किंमत समजू शकते? काहींचं असं म्हणणं असतं की फंडामेंटल ऍनालिसिस द्वारे या अगम्य गोष्टींचा सुगावा लागतो. परंतु प्रत्येकालाच हे सूत्र मिळालं आणि एखाद्या शेअरचं असं अंगभूत मूल्य समजल्यास ग्रेटर फूल कोण ठरणार आणि जर अशी ठोस किंमत एकच असेल तर मग दररोज, प्रत्येक सेकंदागणिक शेअर्सचे भाव का बदलतात ?
याचं उत्तर आहे अपेक्षा आणि निराशा. शेअरच्या प्रत्येक भावामध्ये या भावना कमी जास्त फरकानं असतातच. आणि या भावनाच प्रत्येक क्षणात शेअरचे भाव वरती खाली होण्यास भाग पाडतात. बाजारातील आवेगानुसार शेअरचे भाव सारखे बदलत असतात म्हणजेच मागणी व पुरवठा यामुळं शेअरच्या किंमती बदलतात. जर अधिक लोकांना शेअर विकत घ्यायचा असेल तर मागणी वाढून किंमत वर जाते आणि याउलट शेअरची विक्री करायची झाल्यास पुरवठा वाढून किंमत कमी होते. म्हणजेच बाजारामधील मागणी-पुरवठा जर शेअरचे भाव ठरवणार असतील तर मग शेअरची अंगभूत किंमत पुस्तकी ज्ञान घेऊन अभ्यासण्यापेक्षा या मागणी पुरवठ्याच्या हालचालींचाच अभ्यास करून शेअरचे व्यवहार पार पडतात. त्यासाठी तुलनेनं सोयीस्कर असा तांत्रिक विश्लेषणाचा मार्ग अवलंबतात.
कंपनीचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी प्रथमतः जागतिक अर्थव्यवस्था, स्थूल व सूक्ष्म अर्थव्यवस्था, देशाचा जीडीपी, प्रगतीची क्षेत्रं व त्यामधील उत्तम कंपन्या या गोष्टी अभ्यासाव्या लागतात आणि मग त्या कंपनीच्या शेअर्सचा रास्त भाव शोधण्यासाठी त्या वैयक्तिक कंपनीचा अभ्यास करावा लागतो. यालाच म्हणतात फंडामेंटल ऍनालिसिस. याउलट कोणत्याही कंपनीच्या शेअर्सना अधिक मागणी आहे ते तपासून असा शेअर खरेदी करून त्यामध्ये पुरवठा वाढू लागल्यास तो विकून टाकणे अनेकांना सोपं वाटतं. अशा प्रकारच्या अभ्यासास टेक्निकल ऍनालिसिस म्हणतात. जर प्रत्येक शेअर खरेदीमागं त्यामधून पैसे कमावणं हाच उद्देश असेल तर मग टेक्निकल ऍनालिसिस तुलनेनं सोयीस्कर वाटतो. तांत्रिक विश्लेषणाचा दृष्टिकोन केवळ बाजारातून व्युत्पन्न केलेले भाव व व्हॉल्यूम डेटावरून मूल्य प्राप्त करतो. परंतु, मूलभूत दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीने आंतरिक मूल्यापर्यंत पोहोचतो. हे विविध आर्थिक, उद्योग आणि कंपनी डेटाचे विश्लेषण करून, शेअरच्या भावमूल्याचा अंदाज लावते व बाजाराबाहेरील माहिती समाविष्ट करते. शेअरभावाचं तांत्रिक विश्लेषण आणि कंपनीचं मूलभूत विश्लेषण यातील महत्त्वाचा फरक म्हणजे तांत्रिक विश्लेषण अधिक ठोस आणि वास्तविक बाजारातील मागणी-पुरवठा यांमुळं होणारे भावबदल तपासतं. मूलभूत विश्लेषण अधिक सैद्धांतिक आहे कारण ते शेअरचे अंतर्निहित दीर्घकालीन मूल्य निर्धारित करण्याचा प्रयत्न करतं. तांत्रिक विश्लेषण हे अधिक व्यावहारिक मानले जाऊ शकतं कारण ते अस्तित्वात असलेल्या बाजाराचा आणि आर्थिक साधनांचा अभ्यास करतं, जरी व्यापार क्रियाकल्प कधीकधी तर्कहीन असल्याचे दिसून आले तरी. पुढील लेखांत आपण सोप्या भाषेत टेक्निकल ऍनालिसिस शिकण्याचा प्रयत्न करू.
परकीय गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा थांबेना
मागील आठवड्यात संपलेल्या महिन्यात निफ्टी50 हा राष्ट्रीय बाजाराचा समावेशक निर्देशांक 15780 अंशांवर बंद झाला. जून अखेरीस संपलेल्या सहा महिन्यांत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात 2,83,405 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केलेली आहे. जूनमधील त्यांच्या विक्रीचा आकडा हा 58,112 कोटी रुपये आहे. तांत्रिकी विश्लेषणानुसार निफ्टीसाठी 15700 ही अत्यंत महत्वाची पातळी आहे त्याखाली निफ्टी निश्चितपणे बंद झाल्यास अधिक पडझड होण्याची शक्यता वाटते. उलट दिशेस 16000-16300 हा प्रतिकार टप्पा राहू शकतो. त्याचप्रकारे कच्च्या तेलाच्या किंमती, आतंरराष्ट्रीय घडामोडी, जागतिक व देशांतर्गत महागाईदर, अर्थव्यवस्था वाढीचा दर बदललेली कर प्रणाली अशा गोष्टी बाजाराची पुढील दिशा ठरवू शकतात. अर्थातच ट्रेडर्सना मंदी वा तेजीमध्ये दोन्हीकडं संधी असते तर गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स कमी किंमतीत मिळण्याचं अप्रूप असतं.
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर