पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला
माणगाव : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
पुणे-दिघी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने 1998-99 मध्ये केले होते. त्यावेळी काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम डबर सिमेंटमध्ये करण्यात आले होते. या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दूसर्या बाजूला खोल दर्या आहेत, त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणार्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षणासाठी पत्र्याचे कवच उभारले आहेत. तर काही ठिकाणी अवघड वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी सणसवाडी गावाच्या हद्दीपासून 10 ते 12किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ज्या ठिकाणी अवघड वळणे आहेत, त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने वाहन चालकांना तेथील खोल दर्यांचा धोका संभवत असतो.
ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य धबधबे तसेच भिरा येथील देवकुंड हे पर्यटक व ट्रेकर यांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. त्यामुळे पर्यटक या घाटामध्ये थांबून निसर्गरम्य परिसराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास करत असतात. सुट्टीच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. रस्त्याकडेला उंच डोंगर असल्याने पावसाळ्यात दरडी कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
ताम्हिणी घाटात ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे, तेथे संरक्षक भिंती उभाराव्यात. व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत, अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून होत आहे.