Breaking News

गढूळ पाण्यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबानदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 27 कोटींची शुद्धपाणी योजनादेखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. आजपर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येत असते. आजुबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणीदेखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. असे हे प्रदूषित व अस्वच्छ पाणी नाईलाजाने लोकांना वापरावे लागत आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरूनदेखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम येथील मासे व जलचर प्राण्यांवरदेखील होत आहे. नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे.  शिवाय नगरपंचायत निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी पाली शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ही आश्वासने नक्की प्रत्यक्षात केव्हा उतरणार या आशेवर पालीकर नागरिक आहेत. दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आजारपण सांगून येत नाहीत. यामुळे नागरिकांना शुध्द पाण्याची अपेक्षा आहे.

शुद्ध नळपाणी योजना लालफितीत

शासनाने केलेल्या 2008-09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू श्रेयवादामध्ये ही योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्नदेखील होता. मात्र पालीला ’ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही योजना 27 कोटींवर गेली आहे. दरम्यान, कोटींची मंजूर शुद्धपाणी योजना कार्यान्वित करण्यात कोणत्याच अडचणी नसताना यासाठी थांबून कोणता फायदा आहे. याबाबत विनाकारण न थांबता पालिकरांच्या आरोग्याचा विचार करून शुद्ध पाणीयोजना लागलीच कार्यान्वित करावी. पावसाळ्यात तर पालीकरांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply