सात ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी चुरस; नेरळकडे जिल्ह्याचे लक्ष
कर्जत : बातमीदार
डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत, मात्र टेम्बरे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन तयार झालेल्या रजपे आणि जामरूख या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मात्र जाहीर झाला नाही.
कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या पाच ग्रामपंचायतींची मुदत या वर्षाअखेरीस संपत आहे.राज्य निवडणूक आयोगाने या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुरुवारी (दि. 1) त्या पाच ग्रामपंचायतींमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे. त्यानुसार 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट यादरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, तर 19 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत वैध ठरलेले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान घेतले जाईल. मतमोजणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.
तालुक्यातील टेम्बरे ग्रामपंचायतीचे 2018मध्ये विभाजन झाले होते. या विभाजनानंतर रजपे आणि जामरूख अशा दोन नवीन ग्रामपंचायती निर्माण झाल्या आहेत. त्यात जामरूख या नवीन ग्रामपंचायतीमध्ये टेम्बरे, पेठ, जामरूख, कामतपाडा व सोलनपाडा या गावांचा समावेश आहे, तर रजपे या नवीन ग्रामपंचायतीमध्ये रजपे, शिंगढोल, टेम्बरे आणि काही आदिवासी वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र टेम्बरे ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली असून नवीन ग्रामपंचायतीपैकी एकाला टेम्बरे नाव असावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे पहिल्या निवडणुका होण्यापासून रजपे आणि टेम्बरे या ग्रामपंचायती दूर आहेत. परिणामी त्या विभाजन झालेल्या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कामकाज पाहत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावरच जामरूख आणि रजपे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.
थेट सरपंचपदाचे आरक्षण
1. नेरळ-अनुसूचित जमाती राखीव
2. उमरोली-अनुसूचित जमाती महिला राखीव
3. वाकस-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
4. वरई-सर्वसाधारण
5. तिवरे-अनुसूचित जमाती महिला राखीव