Friday , March 24 2023
Breaking News

96 हजार ‘व्हीव्हीपॅट’चा होणार वापर

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहा लाख कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील 96 हजार मतदान केंद्रांवर काम करणार्‍या 6 लाख कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

व्हीव्हीपॅट यंत्रणा ‘ईव्हीएम’ मशीनसाठी पूरक असून, मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्या संदर्भात माहिती व्हीव्हीपॅट मशीनवरील बटन दाबल्यानंतर मिळू शकेल. मतदान केंद्रांमध्ये हे व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर 7 सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळणार असून, त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य होईल.

या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराबद्दल सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या संदर्भात विभागस्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर जाणार्‍या सुमारे सहा लाख कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासाठी सुमारे एक लाख 35 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 96 हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे; तर अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र झोनल अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply