पाटबंधारे विभागाची तीन धरणे भरण्याच्या मार्गावर; श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वांत कमी पाणीसाठा
रोहे : महादेव सरसंबे
जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. या विभागाची रायगड जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून ती 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वात कमी पाणीसाठा (33 टक्के) उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागाच्या रायगड जिल्ह्यातील 28 धरणांचा विचार करता असाच पाऊस पडत राहिल्यास लवकरच सर्व धरणे 100 टक्के भरतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात गुरुवार (दि. 14)पर्यंत जोरदार पाऊस पडल्याने अनेक धरणांत चांगला पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील फणसाड (ता. मुरूड), वावा (ता. तळा), सुतारवाडी (ता. रोहा), आंबेघर (ता. पेण), कोंडगाव (ता. सुधागड), घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, पाभरे (ता. म्हसळा), संदेरी, वरंध (ता. महाड), कोथुर्डे, भिलावले, कलोते मोकाशी, डोणवत (ता. खालापूर), आणि उसरण ही पाटबंधारे विभागाची धरणे 100 टक्के भरून वाहू लागली आहेत. त्यातून कमी-जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर खिंडवाडी (99 टक्के), कुडकी (98 टक्के), बामणोली (94 टक्के) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
धरण तालुका पाणीसाठा
श्रीगाव अलिबाग 45 टक्के
कार्ले श्रीवर्धन 58 टक्के
रानीवली श्रीवर्धन 33 टक्के
खैरे श्रीवर्धन 88 टक्के
साळोख कर्जत 53 टक्के
अवसरे कर्जत 79 टक्के
मोरबे पनवेल 77 टक्के
पुनाडे उरण 59 टक्के
पाऊस असाच कायम राहिल्यास रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाची उर्वरित धरणे लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील.
RamPrahar – The Panvel Daily Paper