Breaking News

दुर्गप्रेमींनी शोधला ऐतिहासिक ’साबईगड’

टेहळणीचा किल्ला असल्याचा निष्कर्ष

कर्जत ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. हा किल्ला टेहळणीसाठी असल्याचा निष्कर्ष या दुर्गप्रेमींनी काढला आहे.

पुण्यातील निहार श्रोत्री, कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड गेल्या वर्षी साबई डोंगरावर भटकंतीसाठी गेले असता हा एक धार्मिक डोंगर असून येथे एक देवीचे मंदिर आहे, अशी जुजबी माहिती  स्थानिकांकडून त्यांना मिळाली होती, परंतु या डोंगरावर त्यांना अनेक दुर्ग स्थापत्य अवशेष आढळले.

या दुर्गप्रेमींनी शोधलेला साबईगड हा खालापूर आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असून वर जाण्यासाठी खालापूर तालुक्यातील कलोते या गावातून वाट आहे. गडावरील चढाई सोपी असून जायला तीन वाटा आहेत. प्रामुख्याने सोपी आणि पहिली वाट कलोते गावातून थेट गडावर जाते, दुसरी वाट ही गावाजवळील माधवबाग आयुर्वेदिक केंद्राच्या मागून गडावर जाते आणि तिसरी वाट ही खालापूर फाट्याजवळून गडावर जाते. डोंगरावर साबई मातेचे धार्मिक स्थान असून देवीची मूर्ती तांदळा स्वरूपातील आहे. साबई डोंगरावर दुर्ग स्थापत्याच्या अंगाने असलेले अनेक अवशेष आढळून आले आहेत. त्यात एका पाषाणावर वीर देवाची कोरीव मूर्ती असून अनेक ठिकाणी खडकात ओळीने कोरीव पायर्‍या आहेत.

साबई देवीच्या ठिकाणाहून डावी कडून पुन्हा पंधरा पायर्‍या बालेकिल्ल्यावर जातात. गडमाथा चिंचोळा आहे. गडावर टेहाळणीची जागा असून तिथे बांधकामाचे जोते दिसून येते. तसेच पाण्याची टाकीदेखील आढळली आहे. गडामाथ्यावरून सोंडाई, माणिकगड, सोनगिरी, इर्शाळ ह्या किल्ल्यांप्रमाणे राजमाची, प्रबळगड, ढाकबहिरी हेसुद्धा किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. साबईगडा जवळूनच बोरघाटाला जाण्याचे रस्ते आहे. त्यामुळे ह्या गडाचा प्रामुख्याने वापर हा चौकी पहारा देणे तसेच टेहेळणी इत्यादी साठी झालेला असण्याची शक्यता आहे. पुणे आणि कर्जत येथील या गिरिप्रेमी मंडळींनी केलेल्या संशोधनातून खालापूर तालुक्यातील साबई गड हा फक्त धार्मिक डोंगर नसून तो एक गिरिदुर्ग असून त्याचा टेहेळणीचा किल्ला म्हणून उपयोग झाला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 19व्या गिरिमित्र संमेलनात साबईगडाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले असून या मोहिमेला ट्रेकक्षितिज संस्थेचे अमित सामंत, पुण्यातील इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर तसेच नाशिक मधील दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply