सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासिनता
खोपोली : प्रतिनिधी
एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक आवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई, पूणे शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आणि विकासाचा मार्ग मोकळा होत गेला. मुंबई-पूणे महामार्गावरील बोरघाटाचा अवघड टप्पा, खंडाळा बोगदा तयार करताना ब्रिटिशांनी मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती. त्यावेळी ब्रिटीश अधिकार्यांना विश्रांतीसाठी खोपोलीत डाकबंगला तयार करण्यात आल्याचे सांगतात. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गाला लगत खोपोलीतील मोक्याच्या ठिकाणी अडीच एकर जागेत सध्याचे विश्रामगृह आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या खोपोलीतील विश्रामगृहाची सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे. विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे.विश्रामगृहाच्या लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठी दगड लावून आधार देण्यात आला आहे. याशिवाय विश्रामगृह परिसर पूर्णपणे पालापाचोळा आणि कचर्याने भरून गेला आहे. या ठिकाणी खानसामा, सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होत आहे.
विविध घडामोडींचे केंद्र : खोपोली औद्योगिक नगरी म्हणून उदयास येत असताना कामगार युनियन क्षेत्रात नव्याने जम बसविणारे भाई जगताप, विजय मिरकुटे यांच्या बैठका नेहमी या विश्रामगृहावर होत असत. खालापूर तालुक्यातील भूषण स्टिल आणि उत्तम स्टिल कारखान्यात स्थानिक नोकर भरतीवरून आंदोलन पेटल्यानंतर खोपोली विश्रामगृह हे समेटाचे ठिकाण झाले होते. रायगडचे एकमेव मुख्यमंत्री बॅ. अंतुले हेदेखील खोपोली विश्रामगृहाला नेहमी भेट द्यायचे. याशिवाय खोपोली विश्रामगृह हे अनेक राजकीय घडामोडीचे प्रमुख केंद्र झाले होते.
शासकीय विश्रामगृह ही खोपोलीच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. सध्या या नादुरुस्त वास्तूकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या विभागाने विश्रामगृह पूर्ववत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
-किशोर पानसरे, माजी नगरसेवक, खोपोली नगर परिषद
खोपोली विश्रामगृहाकरिता सध्या तरी निधीची तरतूद नाही. हे विश्रामगृह भाडे तत्वाने देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
-प्रशांत राखाडे, अभियंता, सा. बां. विभाग, खालापूर