Breaking News

पाली अंबा नदीपुलाची दैनावस्था

रेलिंग तुटल्या, खड्डे व चिखल; अपघाताचा वाढला धोका

पाली : प्रतिनिधी

सततच्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीवरील जुन्या पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले. त्यामुळे या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठेे खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व राडारोडा पसरला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तसेच वाहन चालक आणि पादचार्‍यांची खूप गैरसोय होत आहे. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पूल मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे आणि मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. मात्र पाली येथील जुन्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्या आधीच या पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) तुटले होते. आता पुलावरून पाणी गेल्यामुळे इतरही रेलिंगही वाहून गेले आहे. त्यांना आधार देणारे सिमेंटचे काही ठोकळेदेखील निसटले आहेत. कमकुवत लोखंडी कठडे, मोठमोठे खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, पुलावर वारंवार वाहून येऊन साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पाली पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलावरील खड्ड्यात अनेक वाहने आदळत आहेत. पादचार्‍यांनादेखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते.

नवीन पूल अपूर्ण

अंबा नदीवरील पाली येथील जुना पूल अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा खोळंबा व गैरसोय झाली नसती.

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.

-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply