Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचा जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून, या कृती समितीच्या भूमिकेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या संदर्भात गुरुवारी (दि. 27) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात पाठिंबा देणारी क्रियाशील पत्रकारांची ही पहिली संघटना आहे.  
या वेळी पनवेल तालुका पत्रकार मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, अनिल भोळे, अनिल कुरघोडे आदी मंचाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
मंचाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या विभागात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्याबाबत आपण जे आंदोलन पुकारले आहे, या आंदोलनास पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्था जाहीर पाठिंबा प्रकट करीत आहे. आमची संस्था ही नोंदणीकृत संघटना असून, आपण करीत असलेल्या आंदोलनातील प्रत्येक घडामोडीला उचित प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि भूमिपुत्रांचे दैवत अशी प्रतिमा असणार्‍या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही आमची भूमिका असून दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपले आंदोलन कितीही तीव्र झाले तरी आम्ही आपल्यासोबत खंबीरपणाने उभे राहू, अशी ग्वाही देण्यात आली असून शेवटी विमानतळाला नाव दिबांचेच, नाही कुणाच्या बापाचे!! असेही अधोरेखित करण्यात आले आहे.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यामुळे शेतकरी, स्थानिक, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे. सर्व समाजासाठी दि. बा. साहेबांनी काम केले. त्यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची आमची कायम भूमिका राहिली आहे. त्या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 24 जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष नियोजनासाठी पनवेल, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वसई, मुंबई या ठिकाणी बैठका घेत आहोत. फक्त आगरी, कोळी, कुणबी, कराडी समाजच नाही, तर संपूर्ण ओबीसी, एसटी अशा सर्व समाजाने या लढ्याला पाठिंबा देऊन आंदोलनात उतरण्याची तयारी केली आहे. पाच हजार वकिलांची फौज या आंदोलनाला ताकद देणार आहे. त्याचप्रमाणे पत्रकारही या लढ्यात सहभाग घेत आहेत याचा मला आनंद आहे. त्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे मी आभार व्यक्त करतो.

Check Also

‌‘स्वर संध्या‌’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply