खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
खोपोली गाव ते वासरंग-मस्को कॉलनी (सुभाष नगर)-स्टाफ कॉलनी सर्कल (जगदीश नगर)-लव्हजी-चिंचवली ही सिटी बस सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली होती. या मार्गावर पुन्हा सिटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजप युवानेते राहुल जाधव यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे बुधवारी (दि. 20) निवेदनाद्वारे केली. खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष स्व. सखाराम जाधव यांनी 1985 साली सुभाष नगर-मस्कॉ कॉलनी-लव्हजी-चिंचवली या मार्गावर सिटी बस सेवा सुरू करून घेतली होती. सुभाष नगर आणि परिसरातील कामगार, विद्यार्थी, महिला या परिवहन सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. लॉकडाऊनमध्ये खोपोली नगर परिषदेने सिटी बस सेवा बंद केली होती. खोपोली, शहरात, लोणावळा व खालापूर तालुक्यातील काही मार्गावर सिटी बस धाऊ लागल्या आहेत. मात्र सुभाष नगर-मस्को कॉलनी-लव्हजी-चिंचवली या मार्गावर अद्यापही सिटी बस सेवा सुरू झालेली नाही. या मार्गावरील जेसीएमएम स्कूल (मस्को कॉलनी) सुरू झाले आहे. खोपोली शहरातील एकमेव स्वामी अय्यप्पा मंदिर सुभाष नगर येथे आहे. तसेच शंकर मंदिर, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, गणेश मंदिर, नुराणी मस्जिद, समाज मंदिर या ठिकाणी नेहमी भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे सुभाष नगर (जाधव मामा चौक) येथे सिटी बस आल्यास त्याचा उपयोग येथील सर्व नागरिकांना नक्कीच होईल, असे जाधव यांनी निवेदनात नमुद केले आहे. सुभाष नगर-मस्को कॉलनी-लव्हजी-चिंचवली या मार्गावर सिटी बस सेवा सुरू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप युवानेते राहुल जाधव यांनी बुधवारी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.