Breaking News

वर्षासहलीसाठी अलिबाग खुणावतेय!

फेसाळलेल्या समद्राच्या लाटा आणि धो-धो कोसळणारा पाऊस, पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट, पश्चिमेककडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत पावसाळ्यात किनार्‍यावर घेतलेला वॉक म्हणजे सुखद अनुभव असतो.अशा वातावरणात समुद्रकिनार्‍यांची सफर करण्याची मौज काही वेगळीच आहे. अलिबाग तालुक्यात केवळ समुद्रकिनारेच आहेत असे नाही तर या तालुक्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासारखे बरेच काही आहे. ऐतिहासिक स्थळे, किल्ले, देवस्थाने, तलाव, धबधबे आहेत.  

मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या शहारांपासून कही तासांच्या अंतरावर असलेले अलिबाग पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. एका दिवसाच्या सुट्टीत सकाळी अलिबागला येऊन सायंकाळी पुन्हा आपल्या घरी जाता येते. त्यामुळे अलिबागला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुंदर समुद्र किनारे, नारळ-फोफळीच्या बागा. अलिबागमधील हे सर्व सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालते. अलिबाग आता मीनी गोवा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पूर्वी फक्त उन्हाळ्यात पर्यटक अलिबागला येत असत आता वर्षा सहलीसाठी देखील अलिबाग फेवरेट बनले आहे. अलिबागला आल्यावर केवळ अलिबागचाच समुद्रकिनारा पाहता येतो असे नाही तर आसपासचे किनारे देखील एका दिवसात पाहता येतात.

आलिबाग तालुक्यात अलिबाग,  वरसोली,  किहीम, आवास, आक्षी, नागावा, रेवदंडा हे स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे आहेत. येथील किनार्‍यालगत असलेल्या कॉटेजेसमध्ये वास्तव्य करून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटता येतो. टूमदार घरे, कॉटेजेस, रिसॉर्ट, नारळ-सुपारीच्या बागा, समुद्रकिनार्‍याच्या आजुबाजूला असलेली सुरूची झाडे आणि सगळीकडे निसर्गाची मुक्त उधळण या भागामध्ये पाहायला मिळते.

अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर पावसाळ्यात वर्षा सहलीचा  आनंद घेता येतो. समुद्रकिनार्‍यावर फिरताना कुलाबा किल्ल्यातदेखील जाता येते. भरती मोठी असल्यास किल्ल्यात जाण्याचे टाळावे. कारण पावसाळ्यात पूर्ण ओहोटी होत नाही. त्यामुळे स्थानिक व्यक्तीला सोबत घेऊन ओहटीच्या वेळीच किल्ल्यात जावे. अन्यथा पावसळ्यात किल्ल्यात जाण्याचे टाळावे. अलिबाग शहरात सरखेल कान्हाजी आंग्रे यांची समाधी, भूचुंबकीय वेधशाळा, काळंगादेवी मंदिर, हिराकोट तलाव या स्थळांनादेखील भेट देता येईल. जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या शेजारी असलेली वन विभागाचे गार्डनदेखील छान आहे. अलिबाग समुद्रकिनार्‍यावर लावण्यात आलेल्या तोफेमुळे या किनार्‍याच्याय सौंदर्यात भर पडली आहे. अलिबाग किनार्‍यावरील सेल्फीपाँईट पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अलिबाग समुद्रकिनार्‍याच्या बंधार्‍यावरून फिरण्याची मजा काही औरच आहे. अलिबागच्या वेशीवर असलेला वरसोली  हा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. किनार्‍यावर असलेले सुरूचे बन हे या किनार्‍याचे वैशिष्ट्य आहे. येथे कॉटेज व रिसॉर्ट आहेत. त्यामुळे निवासाची गैरसोय होत नाही. वरसोलीत आल्यानंतर तेथील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुढे जाता येते. वरसोेलीहून 10 कि.मी. अंतर किहिम समुद्रकिनारा आहे. किहिमच्या समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर कुठेतरी हा समुद्र किनारा पाहिल्याचे आपल्याला भासते. बर्‍याच हिंदी चित्रपटांमध्ये या किनार्‍याचे आपल्याला दर्शन झाले आहे. किहीमला समुद्रकिनार्‍याला लागूनच निवासासाठी बंगले, खोल्या, वाडी, कॉटेजेस यांची व्यवस्था  आहे.

किहिमपासून काही अंतरावर गेल्यास आवास, सासवणे हे समुद्रकिनारे आहेत. देवांचा वास असलेले गाव ते आवास. या गावातील नागेश्वर हे देवस्थान प्रसिध्द आहे. आवासचा समुद्रकिनारा नितांत सुंदर आहे. आवासवरून सासवण्याला जाता येते. सासवण्याला जाताना करमरकरांचे शिल्पालय आहे. ते पाहून पुढे सासवण्याला गेल्यावर तेथे समुद्रकिनार्‍यावर खडाकांवर आपटणार्‍या लाटा, लाटांमधून  अंगावर उडणारे तुषार याचा आनंदच काही वेगळा आहे. अलिबागकडून मुरूडला जाताना आक्षी व नागाव ही दोन गावे लागतात. या गावांनादेखील सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत. आक्षी-नागाव येथील समुद्र किनारे विस्तीर्ण आणि सुरक्षित आहेत. निसर्गाचे मुक्त सौंदर्य, एकांतवास यामुळे हे किनारे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहेत. येथे निवासाची व भोजनाची चांगली सोय आहे. रेवदंडा अलिबागपासून 17 कि.मी. अंतरावर आहे. रेवदंडा हे अलिबाग तालुक्यातील शेवटचे गाव आहे. पुढे कुडलिका नदीवरील पूल ओलांडून गेल्यानंतर मुरूड तालुका सुरू होतो. रेवदंडा किल्ल्यात वसलेलेे गाव आहेे. या किल्ल्याप्रमाणे तेथील समुद्रकिनारादेखील आनंद देतो. कोकणातील खरे सौदर्य येथेच आहे.

कमी खर्चात व वेळेत उत्तम पर्याय

अलिबाग तालुक्यात केवळ समुद्रकिनारेच आहेत असे नाही तर या तालुक्यात पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे बरेच काही आहे. कनकेश्वर, सिध्देश्वर, चौलचे दत्त मंदिर ही डोंगरावर असलेली देवस्थाने आहेत. कणकेश्वर व सिध्देश्वर या दोन ठिकाणी श्रावणी सोमवारच्या दिवशी भाविकांची गर्दी असते. सिध्देश्वरजवळच सागरगड आहे. सिध्देश्वरच्या पायथ्याशी धबधबा आहे. तीनविरा धरण, सिद्धेश्वर, कुर्डूसचा धबधबा या ठिकाणी वर्षासहलीचा चांगला आनंद घेता येतो. वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहचता येईल असे अलिबागसारखे दुसरे ठिकाण नाही. वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी अलिबागला एकदा तरी सर्वांनी यायलाच हवे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply