पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये या विद्यायालयाचे माजी विद्यार्थी असणारे अध्यापक व अध्यापिका चित्रा पाटील, वाय. एस. पाटील, ऊर्मिला गोंधळी, प्रा. एम. के. घरत यांच्या वतीने विद्यालयास 35 खुर्च्या व 10 पंखे भेट देण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका समारंभात प्राचार्या साधना डोईफोडे यांच्याकडे या शालोपयोगी भेटवस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यंदाचे वर्ष हे रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यापूर्वी रवींद्र भोईर, प्रमोद कोळी, ज्योत्स्ना ठाकूर, चंद्रकांत मढवी, रमेश मढवी आदी सेवकांनी शालोपयोगी भेटवस्तू प्रदान केल्या आहेत. माजी विद्यार्थी असणारे अन्य सेवकही शालोपयोगी साहित्य वा भेटवस्तू देणार आहेत. संस्थेचे मैनेजिंग कौंसिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे संस्थेचे सर्वश्रेष्ठ देणगीदार आहेत. उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, हिंदी भाषाध्यापक जे. एच. माळी, आंग्ल भाषाध्यापक देवेंद्र म्हात्रे अन्य रयतसेवक आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. पूजा बगाटे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले, तर सागरकुमार रंधवे यांनी सर्वांचे आभार मानले.