हरिहरेश्वरच्या किनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीबद्दल गुरूवारी उलटसुलट अफवा पसरल्या. मुंबई-पुण्यासारख्या नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी सुरू केली. येणार्या-जाणार्या वाहनांची कसून तपासणी होऊ लागली. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. या घटनेमागे अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याचे गृहखाते देखील सांभाळणार्या फडणवीस यांनी सांगितले. अर्थात तसे असले तरीही सणासुदीच्या दिवसांत बेसावध राहून चालणार नाहीच.
महाराष्ट्राला सुमारे 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्तरेमध्ये दमण गंगेपासून दक्षिणेत तेरेखोलच्या खाडीपर्यंत पसरलेली कोकण किनारपट्टी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे भूषण समजले जाते. एवढ्या महाप्रचंड किनारपट्टीची देखरेख करणे हे काही सोपे काम नाही. समोर अफाट पसरलेल्या अरबी समुद्रातून अनेक लहानमोठी जहाजे जात-येत असतात. त्यामध्ये मच्छिमार बोटींपासून प्रचंड मोठ्या मालवाहू नौकांपर्यंत अनेक जहाजांचा समावेश असतो. या बोटींमधील बेकायदेशीर बोट कुठली हे ओळखणे म्हणजे गवताच्या गंजीमधून सुई शोधण्यासारखेच आहे. तरीही भारतीय तटरक्षक दलाच्या साह्याने महाराष्ट्राचे पोलिस एवढ्या मोठ्या किनारपट्टीवर नियमित गस्त घालत असतात. एवढा प्रयास केल्यानंतर देखील 2008 साली भीषण अतिरेकी हल्ल्याने मुंबई महानगरी हादरली होती. पाकिस्तानी अतिरेक्यांचे हे टोळके समुद्रमार्गेच मुंबईच्या किनार्यावर उतरले होते. त्याच सुमाराला समुद्राची बाजू किती उघड्यावर पडलेली आहे किंवा तेथील सुरक्षा व्यवस्था किती अपुरी आहे याची चर्चा देखील झाली होती. गुरूवारी सकाळी हरिहरेश्वरच्या किनार्यावर एक अज्ञात गलबत भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाच्या नजरेस पडले. ही मध्यम आकाराची नौका बेवारस अवस्थेत भरकटून किनार्याला लागली होती असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. परंतु या घटनेने महाराष्ट्रात काही काळ थोडीशी घबराट उडाली. त्याचे कारणही स्वाभाविक होते. या बोटीवर तीन एके-47 रायफली आणि शेकडो बंदुकीच्या गोळ्या 12 खोक्यांमधून आढळल्या. सदर बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून गेल्या 26 जून रोजी मस्कत जवळील समुद्रात ती बोट बुडाल्याचे कळले होते. या बोटीवर संबंधित मालकीणीचा पती कॅप्टन म्हणून नियुक्त होता. खवळलेल्या समुद्रात इंजिन निकामी झाल्यानंतर एका कोरिअन जहाजाने त्यांना वाचवले. समुद्राला उधाण असल्याकारणाने बोट टोइंग करून नेता न आल्याने ती भरकटली असे एकंदरीत दिसते. तथापि या छोट्याशा बोटीवर एके-47 सारख्या स्वयंचलित बंदुका असण्याचे कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनाग्रस्त बोट जून महिन्यामध्ये मस्कतहून युरोपकडे निघाली होती असे तटरक्षक दलाच्या पत्रकात म्हटले आहे. जून महिन्यामध्ये समुद्र खवळलेलाच असतो. अशा उधाणलेल्या अवस्थेत ही छोटीशी बोट युरोपपर्यंत पल्ला कशी मारणार होती असाही प्रश्न पडतो. अतिरेकी हल्ल्याची शक्यता तूर्त जरी वाटत नसली तरी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होण्याची गरज आहे. समुद्रमार्गे दहशतवादी टोळ्या महाराष्ट्रात शिरकाव करू शकतात याचा अनुभव आपल्या गाठीला आहेच. रस्त्यांवर नाकेबंदी करून फारसे काही हाती लागणार नाही याची जाणीव संरक्षण यंत्रणांना असतेच. समुद्र किनार्यांवर गस्त घालण्याची जबाबदारी फक्त तटरक्षक दलाची नसून किनार्यावरील नागरिक आणि स्थानिक मच्छिमारांनी देखील आगामी काळात डोळ्यांत तेल घालून दक्ष राहण्याची गरज आहे. कारण गणेशोत्सवासारखे सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत.