कर्जत, रोहा, नेरळ येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात
कर्जत : प्रतिनिधी
मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रलोभनांना न भुलता योग्य उमेदवाराला मतदान केल्यास चांगला लोकप्रतिनिधी निवडून येऊन त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करता येते. त्याचप्रमाणे काय योग्य? काय अयोग्य? हे ठरवून आपले मत आपल्यालाच देऊन योग्य निर्णय घ्या. तुम्हाला आयुष्यात कधीही अपयश येणार नाही, असा सल्ला ‘उत्तुंग भरारी‘ चे नितीन पाटील यांनी मंगळवारी (दि. 25) विद्यार्थ्यांना दिला.
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नितीन पाटील यांनी क्लिक करून समारंभाचे उद्घाटन केले.
प्रलोभनांना बळी पडून मतदान केल्यास आपल्या लोकप्रतिनिधींवर आपला हक्क रहात नाही. आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश चांगल्याप्रकारे घडवायचा असेल तर मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे प्रतिपादन महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे यांनी केले.
प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात मतदानाचे महत्व पटवून दिले. मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता मतदानाचा हक्क प्रथम बजवा. तरच आपली लोकशाही सक्षम होईल, असे डॉ. एम. एस. घाडगे सांगितले. यानंतर ’मतदान करूच शिवाय कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता तसेच एकदम निरपेक्ष बुद्धीने आपला मतदानाचा हक्क बजावू.’ ही सामुदायिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनिषा चौधरी यांनी केले. डॉ. भरत टेकाडे, प्रा. निलोफर खान, प्रा. शिल्पा गजबे, प्रा. तनिष्का ठाकरे, रेवती देशपांडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. प्रा. अमोल टेकाडे यांनी आभार मानले.
कर्जत : बातमीदार
नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामण टिपणीस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, अजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नवमतदार नोंदणीचा संकल्प करण्यात आला. तसेच प्रा. सोनम गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मतदार जागृती विषयक शपथ दिली.
अजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग प्रमुख डॉ.स्नेहल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनंत घरत यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. अमोल सोनावणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त ‘होय मी मताचा अधिकार बजावतो‘ आणि ‘व्यवस्था परिवर्तनाचा राजमार्ग मताधिकार’ या विषयावर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ऋतिक विरले याने प्रथम, सागर सकपाळे याने द्वितीय आणि ईशा जानवलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. संतोष तुरुकमाने आणि प्रा. वैभव बोराडे यांनी केले. प्रा. सागर मोहिते, प्रा. दुराज टिवाळे, प्रा. धनंजय कोटांगळे, ग्रंथपाल जागृती घारे, आरती आवटे, नरेंद्र देशमुख आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रा. विकास घारे यांनी आभार मानले.
रोहे : प्रतिनिधी
योग्य वाटणार्या प्रतिनिधीला निवडण्याचा आपल्याला घटनात्मक अधिकार आहे, तो आपण न चुकता बजावला पाहिजे, असे प्रतिपादन रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंके यांनी येथे केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अतुल साळुंके मार्गदर्शन करीत होते. मतदाराने निःसंकोचपणे, निर्भीडपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. तुळशीदास मोकल यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनाविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थिताना मतदान जागृती संदर्भातील शपथ दिली.
मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयात मतदार जनजागृती विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत समीर गजानन शिंदे याने प्रथम तर अनिशा प्रमोद शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला होता. या दोन्ही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत थोरात यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सीमा भोसले, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. शत्रुघ्न लोहकरे, डॉ. अनिल शिंदे, डॉ. कमलाकर कांबळे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.