महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यात महाडमध्ये नागरिकांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगांवर भर दिल्यास उत्पादनात वाढ होऊन निर्यात क्षमता वाढेल असे मत व्यक्त केले.
केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल सोमवारी (दि. 22) महाड क्रांतीभूमिला भेट देत प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी आंबेडकरी अनुयायांशी चर्चा करून केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या योजना आणि राज्य शासनाच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजना इत्यादी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यात आले, तसेच त्यांनी या योजना राबविण्यात असलेल्या त्रुटी देखील जाणून घेतल्या.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजना यशस्वीरित्या राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील नागरिकांच्या दारोदारी वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल याची व्यवस्था करावी, असे मतदेखील त्यांनी यावेळी मांडले.