मुरूड : प्रतिनिधी
कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने गड, किल्ल्यांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. मात्र शनिवार, रविवारी मुरूडमध्ये आलेले पर्यटक जंजिरा किल्ला न पाहताच परतत होते. कोरोनामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त दिवस जंजिरा किल्ला बंद होता. पर्यटक आणि स्थानिक लोक किल्ला सुरू होण्याची वाट पहात होते. आता किल्ला सुरू झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चोहूबाजूला समुद्र असलेल्या जंजिरा किल्ल्यात गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. तसेच पुरातन कलाल बांगडी तोफ पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक या किल्ल्यास भेटी देत असतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या 13 बोटी व दोन मशीन बोटींची सुविधा आहे. गड, किल्ले पर्यटकांना मोकळे केले असले तरी अनेकांना त्याची माहीत नाही. वीकेण्डला मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ होती, त्यापैकी फार थोड्या पर्यटकांनी जंजिरा किल्ला पहाण्याचा आनंद लुटला.