पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयात, तातडीने पीसीए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्यासाठी, आवश्यक विद्युत साहित्याचा पुरवठा करून, कार्यान्वित करण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आल्याने, तो लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा शुक्रवार (30 जुलै) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकरिता कीटकनाशके व रासायनिक जंतुनाशके पुरविणेबाबतचा विषय स्थगित करण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 67 (अ) (क) नुसार कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय योजना करण्याकरिता महानगरपालिकेने वैद्यकिय आरोग्य विभागाच्या मुख्य औषध भांडारगृहासाठी शितगृहे भाडे घेण्यास मान्यता मिळणेबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयात कोविड 19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वेळी मागण्यात आलेल्या इंजेक्शनचा पुरवठा व येणारा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालय येथे कोविड 19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वेळी आवश्यक औषधी, तसेच औषधी साहित्याच्या झालेला खर्च व कळंबोली येथील कोविड समर्पित रूग्णालयात कोविड 19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वेळी मागण्यात आलेल्या औषधी साहित्याचा पुरवठा केलेल्या पुरवठादारांच्या देयकास स्थायी समितीने मंजुरी दिली. सध्या भारतात कोविड19 या रोगाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण सुरू आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीत करणेत आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये रूग्ण व रूग्णांची तपासणी करणारे डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना जेवण, चहा, नाष्टा – अल्पोपहाराचा पुरवठा करणेबाबत प्राप्त झालेल्या निविदेस स्थायी समितीने मंजूरी दिली. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी 30,000 नग व्हीटीम टेस्ट किट खरेदी करण्यासाठी 11 लाख 98 हजार 500 रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी 50,000 नग, 19 लाख 97 हजार 500 रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय पनवेल महानगरपिालकेमार्फत कोविड बाधित रुग्णांसाठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया गोदाम कळंबोली येथील 650 खाटांचया कोविड रूग्णालयाकरिता बाह्यस्तोत्राकडून मनुष्यबळ उपलब्ध होणे कामीच्या ई-निविदेतील न्युनतम स्तरावरील नविदाकाराच्या प्रस्तावास आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधित व बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेकामी येणार्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.