कर्जत : रामप्रहर वृत्त
कर्जत शहरातील गुंडगे-पंचशीलनगर येथील अर्चना भालेराव हिने कराटे कलेत गरूड भरारी घेऊन ह्या वर्षीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार -2019 पटकावून कर्जतच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरले आहे.
महाराष्ट्र खेळ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पनवेल येथे पृथ्वी हॉल, रायगड येथे साजरा करण्यात आला. या वेळी पुरस्कार वितरण करण्यासाठी मुख्य अतिथी भारतीय ऑलम्पिक संघाचे उपाध्यक्ष कुलदीप वत्स, फिल्म स्टार मो. अली खान, दिल्ली ऑलम्पिक संघाचे कॉर्डिनेटर दीपक अग्रवाल, स्पोर्ट्स रेव्हॉल्यूशन ऑफ इंडियाचे सुशील कुमार, किक बॉक्सिंग महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे व परमजित सिंग उपस्थित होते. या वेळी सर्व पुरस्कार विजेते यांचे अभिनंदन करण्यासाठी पालक वर्ग व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रेडिशल शोतोकान शिन्काय कराटे इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर, भारतीय खेळ पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक शैलेश पुरुषोत्तम खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली अर्चना विष्णू भालेराव ही नऊ वर्षे कराटे शिकत आहे. कर्जतमध्ये महिला प्रथम सिनिअर ब्लॅकबेल्ट म्हणून तिने नावलौकिक कमावला आहे.