लंडन : वृत्तसंस्था
इंग्लंडच्या जोस बटलरने आपला आयपीएलमधला फॉर्म कायम राखत पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू… धू… धुतले. त्याने 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी हा सामना गमवावा लागला, पण या सामन्यात ‘बॉल टॅम्परिंग’चा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजावर बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी या वेळी दमदार सुरुवात केली आणि संघाला शतकी सलामी करून दिली. बटलर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची 35.1 षटकांत 3 बाद 211 अशी स्थिती होती. बटलरने खेळपट्टीवर आल्यापासूनच गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बटलरला यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची अभेद्य भागीदारी रचली. मॉर्गनने 48 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 71 धावा केल्या.
या सामन्याच्या अखेरच्या षटकात चेंडू कुरतडण्याचा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी नुकतीच बंदीची कारवाई पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चेंडू कुरतडण्याचा हा प्रसंग ताजा असताना इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेट याने चेंडू कुरतडण्याचा प्रताप केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.