Breaking News

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात केली जातेय रुग्णांची लूट

युवासेनेचे विपूल उभारेंचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी

येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून येथील डॉक्टर पैशाची मागणी करत असून, त्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी तसेच त्यांनी रुग्णांकडून घेतलेले पैसे वसूल करून संबंधीत रुग्णांना परत करावेत, अशी मागणी युवासेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोमसाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात गोरगरीब, कष्टकर्‍यांवर तातडीने व योग्य उपचार केले जातात. मात्र या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्‍या महिला व त्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करून येथील डॉक्टर लुट करीत आहेत. त्याबाबतच्या अनेक तक्रारी युवासेनेकडे आल्या आहेत. रुग्णांकडून पैसे मागणार्‍या डॉक्टरांची चौकशी करावी व त्यांच्याकडून ते पैसे वसूल करून संबंधीतांना परत द्यावेत. तसेच डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, असे विपुल उभारे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बाळासाहेबांची शिवसेनेचे माणगाव तालुका प्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, उपप्रमुख नितीन पवार, युवासेनेचे  वैभव मोरे, योगेश बक्कम, तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, शहर प्रमुख सुनील पवार, शाखा प्रमुख स्वप्नील उभारे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेच्या शिष्टमंडळाने या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, माणगाव तहसीलदार यांनाही दिल्या आहेत. दरम्यान, विपुल उभारे यांनी आमदार भरत गोगावले यांना प्रत्यक्ष भेटून, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकाकडून डॉक्टर 15 ते 20 हजार रुपयांची  मागणी करीत असल्याचे सांगितले. आमदार गोगावले यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. गोमसाळे यांना, दूरध्वनीवरून ज्या डॉक्टरांनी रुग्णांकडून पैसे घेतले असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. युवासेनेचे लेखी निवेदन जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठवून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-डॉ. गोमसाळे,  प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, माणगाव उपजिल्हा रुग्णालय

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply