पोलादपूर : प्रतिनिधी
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून शेतकर्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. जे शेतकरी पी.एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु अद्याप कोणत्याही बॅकेचे पीक कर्ज नसेल, अशा शेतकर्यांनी केसीसी कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या पोलादपूर शाखेचे व्यवस्थापक गजेंद्र घाडगे यांनी केले. पोलादपूर तालुका कृषी अधिकार्यांच्या वतीने देवपूर येथे क्रॉपसॅप अंतर्गत भातशेती शाळेच्या पाचव्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गजेंद्र घाडगे उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करीत होते. शेतकर्याचे उत्पन्न, त्याच्याकडील जमीन, लागवडीखालील क्षेत्र किती आहे, यावरून शेतकर्याला केसीसी अंतर्गत किती कर्ज द्यायचे, हे ठरवले जाते, असे त्यांनी सांगितले.केसीसी अंतर्गत शेतकर्याला तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यापैकी एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते, तर त्यापेक्षा अधिक कर्जासाठी तारण ठेवणे गरजेचे आहे. केसीसी कर्जावर सात टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात तीन टक्के सवलत दिली जाते. शेतमालाच्या विक्रीतून शेतकर्यांनी या कर्जाची परतफेड करणे अपेक्षित आहे, अशी माहिती गजेंद्र घाडगे यांनी या वेळी दिली. कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी भात कापणी व मळणी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर मिशनरी वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, गुरुमाऊली शेतकरी गट अध्यक्ष जगदीश महाडिक, सचिव महादेव शिंदे, माजी सरपंच गणपत महाडिक, प्रविण महाडिक, ज्ञानेश्वर पवार, विजय मोरे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आभार मानले.