Breaking News

परतीच्या पावसाने भातपिकांचे नुकसान

हातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात  परतीच्या पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले आहे. उभी भाताची पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. हाती आलेले भात पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसाने विस्कळीत झालेल्या शेतीचे दृश्य सर्वत्र दिसत असून शेतकरी पाऊस थांबून सूर्यप्रकाशाची वाट पहात आहेत. गेले दोन-चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने  तयार भातपिके कापून तसेच पिकांचे भारे बांधून शेतकर्‍यांनी झोडणी, मळणीची तयारी केली होती. मात्र अचानक परतीच्या पावसाने जोरदार दणका दिल्याने शेतात कापून ठेवलेल्या भाताची कणसे तसेच भाताचे भारे पावसाच्या पाण्यात भिजले. त्यामुळे शेतकर्‍यांचे पुरते नुकसान झाले आहे. तसेच परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तयार उभी पिके शेतातच कोलमडली असून दाणे भिजून त्यांना अंकुर फुटले आहेत. यंदा परतीचा पाऊस उशिरा सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे पिके कापणीच्या अवस्थेत असतानाही शेतकरी वाट पहात राहिला. मागील चार ते पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र गेले काही दिवस संध्याकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह येणार्‍या पावसाने भातपीकाची धुळधाण करून टाकली. विशेषतः दक्षिण रायगडात महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. परतीच्या पावसाच्या दणक्याने हाती आलेले उभे पीक वाया गेले असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.शासनाची यांची त्वरेने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या  पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply