मुरूड : प्रतिनिधी
मृत जनावरे हे गिधाडांचे मुख्य खाद्य आहे. मात्र या खाद्याची वाणवा भासत असल्याने मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यामधील गिधाड संवर्धन मोहिमेची गती मंदावली आहे. गिधाडांचे संवर्धन व त्यांची संख्या वाढण्यासाठी फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क ट्रस्ट व अभयारण्याच्या माध्यमातून गिधाडांच्या आहार केंद्राची संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देऊन, आपल्या हद्दीत मृत जनावरे असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु गिधाडांच्या आहार केंद्राची संकल्पना सुरु झाल्यापासून एकही मृत जनावर मिळालेले नाही. मृत जनावरे मिळत नसल्याने गिधाडांना आवश्यक असणारे खाद्य पुरवता येत नाही. त्यामुळे फणसाड अभयारण्यात गिधाडांचा वावर कसा सुरु होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मृत जनावरांच्या वासामुळे गिधाडे या परिसरात येणार आहेत व त्यांचा अधिवास वाढणार आहे. यासाठी जनजागृतीसुद्धा करण्यात आली आहे. मात्र अभयारण्यात गिधाडांचे आहार केंद्र सुरू झाल्यापासून एकही मृत जनावर मिळालेले नाही. गिधाडांचे खाद्य मिळवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
-दिनेश भोपाळे, अध्यक्ष, ग्रीन वर्क ट्रस्ट