म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात विंचू, सर्प दंशांच्या घटनांत वाढ झाली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत म्हसळा तालुक्यात विंचू,सर्प आणि अन्य दंशांच्या 159 घटनांची नोंद झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सागर काटे यांनी दिली. म्हसळा ग्रामिण रुग्णालयात सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत विंचू, सर्प आणि अन्य दंशाच्या 76 जणांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये विंचूदंशांचे 32, सर्पदंशांचे 11 आणि कुत्रादंशांच्या 27 रुग्णांचा समावेश आहे. तर उर्वरीत सहा रुग्णांना मधमाशी, अन्य किटक, मांजर आणि उंदीर यांनी दंश केला होता. ग्रामिण भागांतील म्हसळा, मेंदडी, खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद आणि पाभरे येथील जिल्हा परिषद दवाखान्यात विंचू,सर्प आणि अन्य दंश झालेल्या 83 जणांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये विंचू 26, सर्प 14, कुत्रा 25 तर अन्य (मधमाशी, मांजर, उंदीर, माकड) दंशांच्या 18 रुग्णांचा समावेश आहे. दक्षता आणि उपायांची माहिती करून घेतल्यास सर्पदंशाच्या आणि मृत्यूच्या घटना टाळता येणे शक्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अनेकदा अन्न उघड्यावर टाकले जाते, त्याकडे उंदीर, पाली किंवा अन्य सरपटणारे प्राणी आकर्षित होतात. उंदरांच्या वासाने साप येऊ शकतात. हे टाळण्यासाठी उरलेले अन्न दूर टाकावे. घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे. चप्पल व शूज पायात घालण्याअगोदर तपासून मगच पायात घालावे. बागेतल्या झाडाच्या फांद्या किंवा वेली खिडक्यांपासून दूर ठेवाव्यात. झाडांवरचे सरडे, पाली घरात येऊ देऊ नयेत. ही काळजी घेतल्यास सर्पदंश टाळण्याचा प्रयत्न करता येईल, असे सर्प अभ्यासकांनी सांगितले. दक्षता घेऊनही सर्पदंश झालाच तर न घाबरता अगोदर पाण्याने दंश झालेली जागा स्वच्छ धुवून घ्यावी आणि वेळ न घालवता उपचारासाठी लगेच जवळच्या रुग्णालयात जावे. कोणताही साप चावल्यास लगेच मृत्यू होत नाही. विषारी सापाचा दंश झाल्यानंतर किमान एक ते दीड तास आपल्याकडे वेळ असतो. लवकरात लवकर उपचार करावेत. कोकणात भातपिक तयार झाल्यावर अन्नाच्या शोधात सर्प, विंचू बाहेर पडतात. भातपिक कापणीची कामे करणार्या शेतकर्यांना वारंवार विंचू दंश होत असतो. विंचूदंश झालेल्या गंभीर रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चोवीस तासांपेक्षा जास्तवेळ ठेवावे लागते.
म्हसळा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात विंचू,सर्प आणि अन्य दंशांच्या 159 घटनांची नोंद झाली आहे. सर्प, विंचूदंश झालेल्या रुग्णाला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करणे हा एकमेव उपाय आहे.
-डॉ. सागर काटेे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा