कर्जत : प्रतिनिधी
मन हे जीवनाचे केंद्र आहे. मन प्रसन्न झालं की तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकता. मन म्हणजेच जाणिव जेव्हा तुम्हाला नियंत्रित करते, तेव्हा तुमचं जीवन भरकटत जातं मात्र जेव्हा आपण जाणिवेला नियंत्रित ठेवतो तेव्हा भरभराट होते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी मंगळवारी (दि. 1) कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे केले. सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनच्या वैजनाथ येथील सद्गुरू सहवासमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मंगळवारी मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. मन स्थिर होण्यासाठी शहाणपणाचे अधिष्ठाण असायला हवे. त्यासाठी सतत सकारात्मक विचार करा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. प्रल्हाद पै पुढे म्हणाले की, मागच्या चुका सुधारून पुढे जात राहणं म्हणजे प्रगती करणे. यासाठी स्वभाव, वागणं, बोलणं यात परिवर्तन करा. भविष्याची चिंता करत बसू नका. जितके शांत राहाल तितकं तुमचं भविष्य चांगलं होईल. रिकाम्या वेळी विश्वप्रार्थना केली तर तुम्हाला कधीच ताण येणार नाही. मंगळवारी चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त चंद्रकांत शिंदे आणि ज्येष्ठ नामधारक अशोक खवळे यांचा जीवनविद्येचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक अशोक खाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपला जीवनप्रवास या वेळी मांडला. माजीमंत्री आमदार गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक या वेळी कुटुंबासह उपस्थित होते. जीवनविद्या मिशनचे कार्य महान असल्याचे सांगून गणेश नाईक यांनी, तत्त्वज्ञानाचा काय फायदा झाला, ते कथन केले. जीवनविद्या मिशन व जीवनविद्या फाउंडेशनचे विश्वस्त दीपक काळे, टाटा पॉवर हाऊसचे मुख्य उभयंता प्रभाकर काळे, मुख्य उभयंता फुलुंद्रे धुरंधर, पोसरीच्या तलाठी जयश्री मोरे, पंकज नाईक, बन्सीधर राणे, श्रीराम मुल्लेमवार, स्वप्नील पराडकर, शीतल गोरे, प्रशांत थारळी, स्वप्नील पराडकर, संतोष सावंत यांच्यासह नामधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.