Breaking News

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘गेल’विरोधात आंदोलन 

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अलिबागमध्ये इशारा

रेवदंडा ः प्रतिनिधी

गेल इंडिया कंपनीकडे उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहेत. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. ते रविवारी (दि. 13) नाईक कुणे येथे आयोजित बैठकीत बोलत होते. अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीत शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, राज्य सुरक्षा दलाच्या भरतीमध्ये 25 टक्के स्थानिक लोकांची भरती करावी, प्रकल्पातील अस्थायी भरती नियुक्ती संघटनेच्या समन्वयाने करावी अशा अनेक मागण्यांसह कंपनी व्यवस्थापनाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात उसर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देण्यात येणार आहे. या संदर्भात नाईक कुणे येथील गणपती मंदिराच्या सभागृहात रविवारी बैठक झाली. या बैठकीस भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सरचिटणीस संतोष पाटील, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, पं.स.चे माजी सदस्य उदय काठे, अ‍ॅड. संतोष पवार, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेेकर, कृष्णा कोबनाक, शरद थळे, सुजित गावंड, जान्हवी पारेख, पंकज अंजारा, शैलेश नाईक, निखिल चव्हाण, लतिकेश भोईर, समीर नाईक यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उसर येथील गेल प्रकल्पग्रस्तांना शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आंदोलनासंदर्भात ग्रामस्थांनी पत्र दिले व प्रत्यक्षात भेटले आहेत. याबाबत शासनाकडे मागणी करणार आहे. न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी स्पष्ट केले.

प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष नरेश ठाकूर, उपाध्यक्ष दत्तात्रेय ठाकूर, कार्याध्यक्ष अनंत शिंदे, सेके्रटरी सुरेश धसाडे, खजिनदार गिरीष पाटील तसेच सदस्य व सल्लागार निलेश गायकर आदींनी बैठक यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

21 नोव्हेंबरला गेट बंद आंदोलन

प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायाविरोधात व निषेधार्थ तसेच न्याय हक्क प्राप्त करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी उसर येथील गेल इंडिया कंपनी गेट बंद आंदोलनाचा इशारा उसर, कुणे, घोटवडे, नाईक कुणे, मल्याण ग्रामस्थांच्या प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत रायगड जिल्हाधिकारी व गेल इंडिया लि.च्या उसर येथील कंपनी व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत मार्गदर्शन करून आपण तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply